नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मेहूल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डॉमिनिका सरकारला भारताने मेहुल चोक्सीविरोधात हद्दपारीची कागदपत्रे सोपवली आहेत. अँटिगाहून क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. सध्या कर्जबुडवा मेहुल चोक्सी डॉमिनिकाच्या ताब्यात आहे. 62 वर्षीय मेहुल चोक्सी 2018 ला भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा या देशामध्ये राहत होता.
पीएनबी घोटाळा प्रकरणातील कागदपत्रे डॉमिनिकाला पाठवण्यात आली आहे. अँटिग्वा आणि डॉमिनिका सरकारांशी भारत सरकार चर्चा समन्वय साधत असून लवकरच मेहुल चोक्सीला भारतात आणले जाईल.
28 मे रोजी भारताचे विमान डॉमिनिका येथे दाखल झाल्याची पुष्टी अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी यांनी केली. मेहूल चौक्सीविरोधात भारत सरकारने काही कागदपत्रे भारतातील न्यायालयांमार्फत पाठविली आहेत. यासंदर्भातील सुनावणी बुधवारी होईल. मेहुल चोक्सीला भारतात नेण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असेही ब्राऊनी म्हणाले.
चोक्सीला हद्दपार करणे गरजेचे -
भारत आणि डॉमिनिकामध्ये थेट प्रत्यार्पणाचा करार नाही, तो अँटिगासोबत आहे. त्यामुळे डॉमिनिका कोर्टाचा निर्णय महत्वाचा असणार आहे. डॉमिनिका कोर्ट आता मेहुल चोक्सीला भारताच्या हवाली करायचं की परत अँटिगाला पाठवायचं याचा निर्णय घेईल. मेहुल चोक्सी हा अँटिग्वावरून क्युबाला पळून जात होता. त्यावेळी त्याला डॉमिनिकामध्ये अवैधरित्या प्रवास केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली आहे. अँटिग्वा, डॉमेनिका आणि भारत या तीन देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतर कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे मेहुल चोक्सीला हद्दपार करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भारताने राजकीय मुत्सद्देगिरी वापरून अँटिग्वाला मेहुल चोक्सीची हकालपट्टी करण्यास भाग पाडायला हवे, असेही अॅड. निकम म्हणाले.
चोक्सीकडून पीएनबीला 13,500 कोटींचा गंडा -
चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआय त्याच्या विरोधात चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता. सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणण्यात येईल असे दिसते. नीरव मोदीचे या प्रत्यार्पण झाल्यानंतर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेल राहणार आहे. याच सेलमध्ये चोक्सीला ठेवण्याची शक्यता आहे.