श्रीनगर : भारतीय सीमेवर पाकिस्तान आणि चीनकडून कुरापती काढल्याच्या घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय हवाई दलाच्या मिग 29 या लढाऊ विमानाला श्रीनगरच्या तळावर तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तान आणि चीनसोबत कोणत्याही परिस्थितला हाताळण्यास मिग 29 विमान सक्षम आहे. श्रीनगर तळावरुन मिग 21 ला हटवून मिग 29 हे लढाऊ विमान तैनात करण्यात आले आहे. मिग 29 हे लढाऊ विमान श्रीनगर हवाई तळावर तैनात करण्यात आल्याने दुश्मनांच्या उरात धडकी भरेल असे मानण्यात येत आहे.
'उत्तर का रक्षक' म्हणून आहे ओळख : मिग 29 या लढाऊ विमानाला 'उत्तर का रक्षक' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मिग 29 या लढाऊ विमानामुळे दुश्मनांच्या उरात धडकी भरते. श्रीनगर काश्मीर खोऱ्याच्या मध्यभागी आहे. श्रीनगरची उंची मैदानी क्षेत्रापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शक्तीशाली सामान या परिसरात नेण्यासाठी मिग 29 सारखे जबरदस्त लढाऊ विमान उपयोगी ठरू शकते. मिग 29 हे लढाऊ विमान कोणत्याही परिस्थितीत लढण्यास सक्षम आहे. काही क्षणात मिग 29 हे दुश्मानांच्या हल्ल्याला प्रतिक्रिया देण्यास सक्षम असल्याची माहिती भारतीय वायुसेनेचे पायलट स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी दिली. मिग 29 हे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. मिग 29 हे लढाऊ विमान सीमेची सुरक्षा लक्षात घेऊन सर्व निकष पूर्ण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सीमेवरील घुसखोरीला लागणार लगाम : पाकिस्तानकडील बाजूने सीमेवर वारंवार घुसखोरी होत असल्यामुळे भारतीय सुरक्षा दलातील जवानांना डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करावे लागते. घुसखोरी करताना अनेकदा दहशतवाद्यांसोबत जवानांच्या चकमकी उडतात. यात अनेक भारतीय जवानांना वीर मरण पत्करावे लागले आहे. दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सातत्याने घुसखोरी करत आहेत. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या मिग 29 लढाऊ विमानाला श्रीनगर तळावर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लढाऊ विमानाची श्रीनगर हवाई तळावर तैनाती करण्यात आल्यामुळे आता सीमेपलिकडून होणाऱ्या घुसखोरीवर लगाम लागण्याची शक्यता आहे.