नवी दिल्ली - कोरोना लसीकरण मोहिमेत भारताने नवा टप्पा गाठला आहे. देशातील नागरिकांच्या लसीकरणाचा आज 83 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही माहिती केंद्री आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 34,167 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजवर कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण हे 3,27,83,741 एवढे झाले आहे. भारतामधील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.77 टक्के आहे.
हेही वाचा-VIDEO धक्कादायक! साडी घातल्याने दिल्लीतील रेस्टॉरंटने महिलेला नाकारला प्रवेश
सलग 87 व्या दिवशी 50 हजारांहून कमी रुग्णांचे प्रमाण
मार्च 2020 नंतर कोरोनामधून रुग्ण बरे होण्याचे आजवरचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. केंद्र सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांकडून कोरोनाच्या संकटात एकत्रित व शाश्वत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण हे सलग 87 व्या दिवशी 50 हजारांहून कमी राहिले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 26,964 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या, देशात कोरोनाचे एकूण 3,01,989 रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणत सक्रिय रुग्णांचे प्रमाण केवळ 0.90 टक्के आहे. हे प्रमाणदेखील मार्च 2020 नंतर सर्वात कमी राहिल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशामध्ये कोरोना चाचणीच्या क्षमता सातत्याने वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 15,92,395 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आजपर्यंत 55. 67 कोटींहून अधिक कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-दहशतवाद्यांशी संबंध असलेले जम्मू आणि काश्मीरचे सहा सरकारी कर्मचारी बडतर्फ
लसीकरण करत अनेक देशांना टाकले मागे-
यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीकरण वेगवान पद्धतीने करण्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. आरोग्य संघटनेने म्हटले होते, की भारताने केवळ 13 दिवसांमध्ये 65 कोटी डोसवरून 75 कोटी डोसपर्यंतचा टप्पा गाठला आहे.