नवी दिल्ली - तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापिते केल्यानंतर काबूल विमानतळावर देश सोडणाऱ्यांची प्रंचड गर्दी होत आहे. अशा परिस्थितीतच गुरुवारी मध्यरात्री काबूलच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये जवळपास 72 नागरिकांचा बळी गेला. या घटनेचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारचा दहशतवाद आणि त्यांच्या कारवायांना मदत करणाऱ्या विरोधात जगाने एकत्र उभे राहिले पाहिजे, असे मतही भारताकडून व्यक्त करण्यात आले आहे.
या दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोटात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हा हल्ला ISIS-K या दहशतवादी संघटनेनी केल्याचे मान्य केले आहे.
काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही संवदेना व्यक्त करतो. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. अशा प्रकारचे हल्ल्यामुळे हे निश्चित आहे की, दहशतवाद आणि त्याला मदत करणाऱ्याविरोधात जगाने आता एक होणे गरजेचे आहे.
अफगाणीस्तानमधून 31 ऑगस्टपर्यंत अमेरिका आपले सैन्य माघारी घेणार आहे. त्यामुळे अनेक देश आपले नागरिक अफगाणिस्तानातून बाहेर काढत असतानाच हा आत्मघातकी हल्ला झाला. गेल्या आठवडाभरापासून तालिबान्यांच्या भीतीने गांगरून गेलेले हजारो अफगाणी देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी करत आहेत.
पाश्चिमात्य राष्ट्रांनी तेथे संभाव्य हल्ल्याचा दिला होता इशारा-
काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ स्फोट झाल्यामुळे अज्ञात लोकांचे बळी गेले आहेत, ”असे ट्विट अमेरिकेच्या सार्वजनिक व्यवहार विभागाचे संरक्षण सचिव जॉन किर्बी यांनी केले आहे. पेंटागॉनचे म्हणणे आहे की, काबूल विमानतळाच्या बाहेर स्फोट झाला. प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, स्फोटात झालेल्या जीवितहानीबाबत तात्काळ कोणतीही माहिती मिळालेली नाही. हजारो अफगाणी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेक दिवसांपासून विमानतळावर जमले आहेत.
अफगाणिस्तानच्या तालिबानांच्या ताब्यातून हजारो लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रांनी तेथे संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. तसेच तालिबानी हे आत्मघाती बॉम्बस्फोट करतील यामुळे अनेक देशांनी काल नागरिकांना विमानतळावर जाण्याचे टाळवे असे आवाहन केले होते.