बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यावधींची अवैध रक्कम जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले आहे. आयकर विभागाने २० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, जी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या काही उमेदवारांनी बेकायदेशीर खर्चासाठी जमा केल्याचे सांगितले जाते.
फेअरफिल्ड लेआउटसह विविध ठिकाणी शोध : माहितीनुसार, (दि. 4 मे)रोजी करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान, बेंगळुरू आणि म्हैसूरमधील विविध फायनान्सर्सकडून एकूण 15 कोटी रुपयांहून अधिक रोख आणि सुमारे 5 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. आयकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बेंगळुरूमधील शांतीनगर, कॉक्स टाऊन, शिवाजीनगर, आरएमव्ही कॉलनी, कनिंगहॅम रोड, सदाशिवनगर, कुमारपार्क वेस्ट, फेअरफिल्ड लेआउटसह विविध ठिकाणी शोध घेण्यात आला आहे.
एकट्या बेंगळुरूमध्ये 82 कोटी रुपयांची रोकड आणि वस्तू जप्त : आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'कर्नाटक विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसतसे, आयकर छापे अधिक तीव्र केले जात आहेत. आजपर्यंत राज्यात छापे टाकून कोट्यवधींची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक राज्यात विविध विभागीय अधिकाऱ्यांनी छापे टाकून ३३० कोटींहून अधिक किमतीची रोकड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. मतदारांमध्ये भेटवस्तू म्हणून ते वाटप करायचे होते, असे सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बेंगळुरूमध्ये सर्वाधिक जप्ती झाल्या आहेत. एकट्या बेंगळुरूमध्ये 82 कोटी रुपयांची रोकड आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपुर्वी पडला होता छापा : विभागाने म्हैसूरमधील एका व्यावसायिकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. हा व्यापारी पुत्तूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळपासूनच त्याच्या ठिकाणांवर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली. दरम्यान, पैशे मोठ्या हुशारीने लपून ठेवल्याचे समोर आले आहे. सध्या आयकर विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
हेही वाचा : Income Tax In Karnataka raids : कर्नाटकात आयकर विभागाचे छापे, एक कोटी रुपये जप्त