पणजी - आधी काँग्रेस मग तृणमूल असा प्रवास केलेले आलेक्स रेजिनाल्ड पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर ( Alex Reginald Will Join Congress Again ) आहेत. त्यांनी नुकताच आपल्या तृणमूलच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला ( Alex Reginald Resigned From TMC ) आहे. २०१७ साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आलेक्स रेजिनाल्ड हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. मात्र, नुकताच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
तृणमूलच्या अपेक्षांवर पाणी
काँग्रेसच्या निष्ठावंत व मोठ्या नेत्यांना फोडून तृणमूल काँग्रेसने राज्यात आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील मोठी नावे म्हणजे लूझीनो फलेरो आणि आलेक्स रेजिनाल्ड. मात्र, आलेक्स रेजिनाल्ड यांना बहुधा बंगालचे पाणी आवडले नाही. म्हणून त्यांनी आपल्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते. आलेक्स रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेसचा पुरता बोजवारा उडाला आहे. दक्षिण गोव्यातील बहुतांशी ख्रिस्ती मतदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तृणमूलच्या नेत्यांनी लाखो रुपये खर्च करून बॅनरबाजी केली होती. जसे काही आलेक्स रेजिनाल्ड यांच्या खांद्यावर बसून तृणमूलला गोवा जिंकायचे होते. तसे आवाहन देखील त्यांनी गोवेकरांना केले होते. मात्र, आलेक्स रेजिनाल्ड यांच्या एका राजीनाम्यामुळे तृणमूलच्या सर्व प्रयत्नावर एक प्रकारे पाणी पडले आहे.
माघारी येण्यासाठी लोबो प्रयत्नशील
मायकल लोबो यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्व काँग्रसची राजकीय बांधणी करण्यासाठी लोबो पुढे सरसावले आहेत. त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक डावपेच आखायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आलेक्स रेजिनाल्ड यांना पक्षात घेण्याचे आवाहन त्यांनी पक्षीय नेतृत्वाला केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार आलेक्स रेजिनाल्ड स्वगृही परतत आहेत.
![मायकल लोबो](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-goa-3-panaji-10058_17012022003906_1701f_1642360146_38.jpeg)