भुवनेश्वर : सध्या 'प्राईड मंथ' सुरू असतानाच, ओडिशा सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस खात्यामध्ये आता कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदासाठी ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही अर्ज दाखल करता येणार आहे. पोलीस खात्याने यासंबंधी सूचना जारी केली असून, या पदांसाठी पात्र ट्रान्सजेंडर व्यक्तींनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले आहे.
ओडिशा पोलीस खात्यामध्ये ४७७ उपनिरीक्षक आणि २४४ कॉन्टेबल (कम्युनिकेशन) पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी २२ जून ते १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. यासाठी सरकारने महिला आणि पुरुषांसह ट्रान्सजेंडर व्यक्तींनीही अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.
ऑल ओडिशा ट्रान्सजेंडर वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा मीरा परिदा यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. "ट्रान्सजेंडर समाजाच्या दृष्टीने विचार करुन घेतलेल्या या निर्णयासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे आभार मानतो. यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींचा आत्मविश्वास तर वाढेलच, मात्र समाजाचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होणार आहे", असे मत मीरा यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : मंदिराच्या आवारात आढळला नवविवाहितेचा मृतदेह; हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप