अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांचा शपथविधी -
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस आज (२० जानेवारी) शपथ घेणार आहेत. ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार होण्याची शक्यता असल्याने वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शपथविधीपूर्वी राजधानी वॉशिंग्टनला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
भारत आजपासून अन्य देशांना करणार कोरोना लसीचा पुरवठा -
इतर देशांना कोरोनावरील लसींचा पुरवठा करण्याची सुरुवात भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशपासून होणार आहे. भारत बुधवारी शेजारील बांगलादेशला २० लाख लसींचे डोस पाठवणार आहे. हे डोस सीरम इन्स्टिट्युटने उत्पादन केलेल्या कोविशिल्डचे असतील.
मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी -
मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजपासून होणार आहे. २५ जानेवारी ही तारीख आधी निश्चित करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण आजच लिस्ट झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.
तांडवप्रकरणी यूपी पोलीस मुंबई होणार दाखल -
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची वेब सीरीज तांडव विरोधात सोमवारी लखनऊ येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चोकशीसाठी यूपी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले होते. हे पथक बुधवारी मुंबईत दाखल होणार असून अमॅझॉन प्राइमचे कंटेंट हेड, निर्माता, रायटर आणि वेबसीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची चौकशी केली जाणार आहे.
मंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार -
राज्याचे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा आज जनता दरबार भरणार आहे. उदय सामंत यांनी ट्विट करून सांगितले, की मी शिवसेना राज्य संपर्क कार्यालय 'शिवालय' मुंबई येथे बुधवार, दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत 'जनता दरबार' घेणार आहे. कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. हा उपक्रम कोविड - १९ च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे.
सरपंचपदाच्या लॉटरीची आज सोडत -
१५ जानेवारी रोजी राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण काढणाऱ्या सोडती देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ डिसेंबर रोजी यापूर्वीच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चित करणाऱ्या सर्व सोडती रद्द केल्या होत्या. त्याची सोडत आज पार पडणार आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. जब्बर पटेल -
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ या महोत्सवाने उपलब्ध करून दिले आहे. या महोत्सवात आज अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल दुपारी १२ वाजता संबोधन करणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी घेणार दगडूशेटचे दर्शन -
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुणे दौऱ्यावर असून आज सकाळी ते पुण्याचे प्रसिद्ध श्रीमंत दगडू शेट हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
६ लाख लाभार्थ्यांना आर्थिक मदत -
आज 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता उत्तर प्रदेशात प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातील 6 लाख लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहतील. लाभार्थ्यांना 2,691 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
गोव्यातील इफ्फी महोत्सवाचा आज पाचवा दिवस -
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे आयोजन पणजी येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. भारतीय अंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव 16 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत सुरू राहील. यावेळी जगभरातील 224 चित्रपट या महोत्सवात सामील झाले आहेत.