राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू
राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दररोज 60 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात आज रात्री 8 वाजेपासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्याबद्दल सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू असणार आहेत.
लोकल, मेट्रो आणि मोनोची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद!
मुंबई - महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आता नव्या नियमावलीनुसार लोकल, मेट्रो, मोनो प्रवासात फक्त सरकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहे. नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
नाशकातील घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल- मुख्यमंत्री ठाकरे
नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल. शिवाय, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
कोल्हापुरात 48 तासात कोणत्याही क्षणी २६ ऑक्सिनचे टँकर येणार
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा लवकर उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र सरकारने रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 26 टँकर ऑक्सीजन येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोल्हापुरातील रेल्वे मार्केट यार्ड येथे युद्धपातळीवर काम सुरू असणार असून येत्या दोन दिवसात हे ऑक्सिजनचे टँकर कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे.
गोव्यात आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू
देशभरात कोरोनाने कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारनेही आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच गर्दीची ठिकाणे पूर्णतः बंद तर काही 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. तसेच राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्वांची अंमलबजावणी 30 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
राजस्थानमध्ये आजपासून 21 मेपर्यंत कलम 144 लागू
नवी दिल्ली आणि महाराष्ट्रानंतर आता राजस्थानामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामुळे राजस्थान सरकारने आजपासून 21 मेपर्यंत कलम 144 लागू केली आहे.
सलमानच्या बहुचर्चित 'राधे' सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला
सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्म सह थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा आज ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आयपीयलमध्ये आज रंगणार बंगळुरूविरोधात राजस्थानचा सामना
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे.