- दिल्ली चलो आंदोलनाचा ३४वा दिवस; आजची चर्चा गेली पुढे..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ३४वा दिवस आहे. गेल्या ३३ दिवसांपासून लाखो शेतकरी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर बसून आहेत. दरम्यान, आज कृषी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा होणार होती. मात्र, ही चर्चा आता बुधवारवर ढकलण्यात आली आहे.
- दत्तजयंती निमित्त देवगडकडे जाणारे रस्ते आजपासून बंद..
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस देवगडकडे जाणारे रस्ते बंद राहाणार आहे. हा निर्णय श्री. दत्त मंदिर देवगड संस्थानने घेतला असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक भास्करगिरी महाराज यांनी दिली.
- पूर्वेकडील मालवाहतुकीच्या 'न्यू भाऊपुर-न्यू खुर्जा' विभागाचे उद्घाटन..
पंतप्रधान मोदी आज इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअर (ईडीएफसी)चे न्यू भाऊपूर-न्यू खुर्जा विभागाचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर पूर्वेकडील व्यापाराला चालना मिळण्यासाठी या मार्गावर आता मालगाड्यांची ये-जा होणार आहे. सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदी याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करतील.
- विप्रोच्या शेअर्सची बाय-बॅक ऑफर आजपासून सुरू..
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो आजपासून आपले शेअर पुन्हा विकत घेणार आहे. सुमारे साडे नऊशे कोटींचे शेअर्स ११ जानेवारीपर्यंत ही कंपनी विकत घेणार आहे. ४०० रुपये प्रतिशेअर या किंमतीने सुमारे २३.७५ कोटी शेअर्स ही कंपनी विकत घेणार आहे. बिड्सचे शेवटचे सेटलमेंट २० जानेवारी किंवा त्यापूर्वीच होणार आहे.
- डीसी कार्स मालक दिलीप छाबरिया अटक प्रकरणी मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद..
डीसी कार्स कंपनीचे मालक दिलीप छाबरिया यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोलीस आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
- बॉक्सिंग डे कसोटीचा चौथा दिवस; भारताचे पारडे जड..
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यामध्ये भारताचे पारडे जड दिसून येत आहे. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावात ६ गडी बाद १३३ अशी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडे २ धावांची आघाडी असून त्यांचे ४ गडी शिल्लक आहेत.
- पाकिस्तान-न्यूझीलंड कसोटीचा चौथा दिवस; पाकिस्तानचा फॉलोअप टळला..
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघावर फॉलोऑनचे सावट होते. तेव्हा पाकच्या मोहम्मद रिजवान आणि फहिम अशरफ या दोघांनी चिवट खेळी करत न्यूझीलंडचे मनसुबे उधळून लावले. पाकचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाचा खेळ, काही षटके शिल्लक असताना २३९ धावांत आटोपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या आहेत. यामुळे त्यांच्याकडे १९२ धावांची मजबूत आघाडी आहे.
- 'रामायण'चे दिग्दर्शक रामानंद सागर यांचा जन्मदिन..
प्रसिद्ध अशा रामायण या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचा आज जन्मदिन आहे. १९१७ साली लाहोर येथे त्यांचा जन्म झाला होता. ७८ भागांच्या रामायण मालिकेने रामानंद सागर यांना घराघरात पोहोचवले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. २००५ साली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
- नॅनोटेक्नॉलॉजीचा पाया रचला गेला..
आजच्याच दिवशी नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी आपले प्रसिद्ध 'देअर इज प्लेन्टी ऑफ रुम अॅट दि बॉटम' हे भाषण दिले होते. हे भाषण म्हणजेच नॅनोटेक्नोलॉजीची सुरुवात मानले जाते.
- आजचा 'कोल्ड मून' दिसणार अधिक काळ..
आज वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे. वर्षाच्या शेवटच्या पौर्णमेच्या चंद्राला 'कोल्ड मून'ही म्हटले जाते. आजचा कोल्ड मून हा विशेष असणार आहे. कारण, हा कोल्ड मून सर्वाधिक काळ आकाशात दिसणार आहे. वर्षभरात झालेल्या इतर पौर्णिमांपेक्षा अधिक काळ हा चंद्र क्षितिजाच्या वर असणार आहे. तसेच, ३० तारखेलाही हा चंद्र पूर्ण रुपात, आणि अधिक प्रकाशमान दिसणार आहे.