- दिल्ली चलो आंदोलनाचा ३० वा दिवस; दिल्लीकडे मोठ्या प्रमाणात रवाना होणार शेतकरी
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३०वा दिवस आहे. गेल्या २९ दिवसांपासून हे कायदे मागे घ्यावेत यासाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
- आज जगभरात साजरा होतोय नाताळ..
येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाणारा नाताळ हा सण आज जगभरात साजरा केला जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच खबरदारी बाळगत हा सण साजरा करण्यात येत आहे.
- आज अटल बिहारी वाजपेयींची जयंती..
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९६वी जयंती आहे. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशामधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले. वाजपेयी यांना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
- शिमला-भोपाळमध्ये अटलजींच्या पुतळ्यांचे अनावरण..
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शिमल्याच्या रिज मैदानात अटल बिहारी वाजपेयींच्या १८ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासोबतच, भोपाळमध्येही १,३०० किलो वजनाच्या १२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
- पंतप्रधान मोदी साधणार सहा राज्यांमधील शेतकऱ्यांशी संवाद..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना मोदींनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आखला आहे.
- ९ कोटी शेतकऱ्यांना मिळणार निधी..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 'किसान सम्मान योजने'चा दुसरा टप्पा पार पडणार आहे. यामध्ये देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार कोटी रुपये रक्कम जमा होणार आहे.
- अटल बिहारी वाजपेयी पुस्तकाचे प्रकाशन..
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये 'अटल बिहारी वाजपेयी' या पुस्तकाचे प्रकाशन करतील. अटल बिहारी वाजपेयी हे पुस्तक लोकसभा सचिवालयामार्फत प्रकाशित करण्यात येत आहे. यामध्ये वाजपेयी यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि संसदेतील त्यांच्या काही विशेष भाषणांचा समावेश आहे. यासोबतच, या पुस्तकात वाजपेयी यांची काही दुर्मिळ छायाचित्रेही प्रकाशित करण्यात आली आहेत.
- आज सुशासन दिन..
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशात सुशासन दिन साजरा केला जातो. वाजपेयी यांच्या कार्यासाठी २०१४ साली या दिनाची घोषणा करण्यात आली होती. आज पंतप्रधान मोदी हे वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील.
- उत्तर प्रदेशमध्ये किसान संवाद कार्यक्रम..
उत्तर प्रदेश भाजपा आज किसान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. भाजपाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये तब्बल २,५०० ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाईल. यादृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि पक्षाचे नेते राधामोहन सिंह यांनी दिली.
- आज भारतरत्न मदनमोहन मालवीय यांची जयंती..
आज महामना मदन मोहन मालवीय यांची जयंती आहे. मालवीय यांनी काशी हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्येही त्यांचे मोलाचे योगदान होते. महामना ही उपाधी मिळालेले ते देशातील पहिले आणि कदाचित शेवटचे व्यक्ती आहेत. यासोबतच, मालवीय यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नही मिळाला आहे.