मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालय देणार आज अंतिम निकाल
नवी दिल्ली - मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास मराठा आरक्षण प्रकरणी राखीव असलेला निकाल सुनावणार आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत बुधवारी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
ममता बॅनर्जी आज सलग तिसऱ्यांदा घेणार बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा ममता बनर्जी यांचे सरकार स्थापन होणार आहे. ममता बनर्जी बुधवारी सकाळी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ममता यांचा शपथविधी कार्यक्रम राजभवनाच्या टाउन हॉलमध्ये साध्या पद्धतीने पार पडेल. या कार्यक्रमासाठी प्रशांत किशोर यांच्यासह टीएमसीचे दिग्गज नेते उपस्थित असतील. त्याचबरोबर क्रिकेटपटू सौरव गांगुली, माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, डाव्या आघाडीचे विमान बोस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनाही शपथविधी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक -
बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी उपायांवर चर्चा केली जाण्याबरोबरच लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
मुंबई महापालिका स्थायी समितीची आज बैठक -
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक बोलाविण्यात आली आहे. पालिकेच्या समितीने बुधवारी होणाऱ्या बैठकीचा मसुदा जाहीर केला असून, यामध्ये अनेक मुद्दे बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
रेमडेसिवीर वाटपप्रकरणात सुजय विखेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी -
रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत आपल्यालाही प्रतिवादी करावे, असा अर्ज नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने करण्यात आला आहे. आपण १७०० इंजेक्शन चंदीगड येथे खरेदी करून शिर्डीला आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर आज सुनावणी होणार असून डॉ. विखे यांना प्रतिवादी करून घ्यायचे किंवा नाही, यावरही त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजपची आज देशभर निर्दशने -
पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बंगालमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. या घटनांचा भाजपने निषेध केला असून भाजप त्याविरोधात आज देशभरात निर्देशने करणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर असून ते कोलकाता परिसरातील हिंसक घटना घडलेल्या स्थानांची पाहणी करतील.
सांगली जिल्ह्यात आठ तर कोल्हापूरमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन -
सांगली/ कोल्हापूर - राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू असतानाच आता सांगलीत हे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनीच जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाणार आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता आजपासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीत हा निर्णय घेतला. बुधवार 5 मे सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन असणार आहे.
मुंबईत दुपारी १२ वाजल्यापासून लसीकरणास सुरूवात -
मुंबई - मुंबईमधील कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिकेला मंगळवारी १ लाख लसींचा साठा प्राप्त झाला आहे. हा साठा आज बुधवारी सकाळी लसीकरण केंद्रांवर वितरित केल्यावर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबईतील ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.
जपान व दक्षिण कोरियामध्ये बालदिन -
जपान व दक्षिण कोरियामध्ये आज बालदिन आहे. दरवर्षी ५ मे हा दिवस जपान व दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त या देशात अनेक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.