नवी दिल्ली - कोरोनाबाधितांच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसत असताना आशादायक बातमी आहे. येत्या चार ते सहा आठवड्यांत कोरोनाची लाट कमी होईल, असा विश्वास आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
भारतीय अपेक्स मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोनाच्या भविष्यातील संसर्गाविषयी ईटीव्ही भारतशी बोलताना अंदाज व्यक्त केला. आयसीएमआरचे प्रवक्ते डॉ. लोकेश म्हणाले की, कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण होत आहे. विदेशातील कोरोना स्ट्रेनमुळे संसर्ग आणि मृत्युंचे प्रमाण अधिक नाही. तर विविध कारणांमुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे.
हेही वाचा-निस्वार्थ सेवेला सलाम... पीपीई किटमध्येच नर्स झोपली जमिनीवर
तज्ज्ञांच्या मते देशातील आरोग्य यंत्रणा सध्या ढेपाळली असताना कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविणे कठीण आहे. आयसीएमआर प्रवक्त्याने म्हटले, की ही कोरनाची लढ येत्या चार ते सहा आठवड्यात नियंत्रणात येईल, असा आम्हाला विश्वास आहे. येत्या चार ते सहा आठवड्यात कोरोनाची लाट कमी होईल, अशी आशा असल्याचे डॉ. लोकेश यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-मृत्यूनंतरही भोग सरेना.. धुळ्यात मृतदेहाच्या खिशातले पैसे लांबवले, घटना सीसीटीव्हीत कैद
केंद्र सरकारकडून लसीकरणावर भर द्यायला हवा होता-
हेल्थ केअर प्रोव्हायडर्स इंडिया असोसिएशनचे महासंचालक डॉ. गिरीधर ग्यानी म्हणाले, की सध्याचे म्युटेशन हे थेट फुफ्फुसांवर हल्ला करत असल्याने जास्तीत जास्त मृत्यू होत आहेत. ही कोरोनाची लाट अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि सार्वजनिक ठिकाणी झालेले विविध कार्यक्रमांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे भारतीय आरोग्याच्या पायाभूत सुविधा ढेपाळली आहे. केंद्र सरकारने कोरोना लशींच्या उत्पादनावर अधिक भर द्यायला हवा होता. त्यासाठी अधिक निधीची तरतूद करायला हवी होती, असे त्यांनी मत व्यक्त केले.
शुक्रवारी आढळले 3.86 लाख नवीन कोरोनाबाधित-
दरम्यान, 1 मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी होणाऱ्या लसीकरणासाठी अनेक राज्यांनी असर्मथता व्यक्त केली आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार 3.86 लाख नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 3 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युच्या प्रमाणात महाराष्ट्र प्रथम (771) , दिल्ली (395) दुसरा तर उत्तर प्रदेश (295) तिसरा आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना अधिक संसर्गजन्य असलेल्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोरोनाचे संसर्गाचे प्रमाण अधिक असलेल्या क्षेत्रात प्रतिबंधित करून उपाययोजना करण्याचे निर्देशही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.