हैदराबाद - देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील परिस्थिती बिकट आहे. 'कोरोना'वरील उपचारांसाठी डॉक्टरांकडून लाखो रुपये उकळण्यात येत आहेत. मात्र, हैदराबादमधील डॉ. व्हिक्टर इम्यानूएल यांनी कोरोना काळात रुग्ण सेवेचे व्रत घेतले आहे. गरिब लोकांना उपचार उपलब्ध व्हावा, यासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून गरीब रुग्णांकडून फक्त दहा रुपये तपासणी शुल्क आकारत आहे.
वर्ष 2018 पासून डॉ. व्हिक्टर इम्यानूएल हैदराबादमधील बोडूप्पल येथील त्याच्या क्लिनिकमध्ये गरीब रूग्णांवर फक्त 10 रुपये शुल्क घेऊन उपचार करत आहेत. 10 रुपयात उपचार मिळवण्यासाठी रुग्णाकडे पांढरे रेशन कार्ड किंवा अन्न सुरक्षा कार्ड असणे गरजेचे आहेत.
गरजू लोकांची सेवा करण्यासाठी मी रुग्णालय सुरू केले. पांढरे रेशन कार्ड किंवा अन्न सुरक्षा कार्ड असेल्या आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना उपचार दिला जातो. तसेच याप्रकारे शेतकरी, अॅसिड हल्ल्यातील पीडित, अनाथ आणि जवानांना हीच सोय दिली आहे. कोरोना संकटात गरिबांना मदत करून त्यांचा विविध प्रयोगशाळेच्या चाचण्याचा आणि औषधांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे डॉ. व्हिक्टर इमॅन्युएल यांनी सांगितले.
मधुमेह, ह्रदयाशी संबंधित समस्या, मज्जातंतूशी संबंधित समस्या आणि इतर सामान्य आजारांसारख्या विविध आजारांवर ते उपचार करतात. सध्या ते दररोज 100 हून अधिक रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी नमूद केले, की गेल्या एका वर्षात त्यांनी 20 हजार ते 25 हजार पेक्षा जास्त कोरोना रूग्णांवर उपचार केला आहे.
एका प्रसंगाने बदलले आयुष्य -
एकदा मी एका महिलेला रुग्णालयासमोर रस्त्यावर भीक मागताना पाहिले होते. कारण, तीच्याकडे आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या पतीसाठी औषधे खरेदी करण्याकरीता पैसे नव्हते. या घटनेने माझे आयुष्य बदलले. तेव्हाच मी गरीब लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंतच्या या संपूर्ण प्रवासात, माझी पत्नी जी स्वत: डॉक्टर आहे, यासह माझे मित्र आणि कुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला, असे डॉ. व्हिक्टर इमॅन्युएल यांनी सांगितले.
रुग्णांचा आत्मसन्मान जपावा यासाठी मी 10 रुपये शुल्क घेत असल्याचे इमॅन्युएल यांनी सांगितले. मी मोफत का उपचार देत नाही, असा प्रश्न मला अनेकांनी विचारलायं. मी दहा रुपये आकारतो कारण रूग्णांनी असे समजू नये की मी त्यांच्यावर दया दाखवत आहेत. मी दहा रुपये शुल्क घेतल्याने त्यांचा स्वाभिमान जपला जातो, असेही इमॅन्युएल म्हणाले.