शामली : धार्मिक टीकेवरून सध्या देशात वातावरण तापले आहे. मात्र याउलट उत्तर प्रदेशातील शामलीमधून जातीय सलोखा आणि बंधुभाव वाढवण्याचा एक मोठा उपक्रम समोर आला आहे. येथे मुस्लिम लोकसंख्या नसलेल्या गावातील लोकांनी पुढाकार घेऊन मुघल सत्तेच्या इतिहासाशी संबंधित 300 वर्षांहून अधिक जुनी मशीद जतन केली ( Historical mosque in Shamli ) आहे. गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही. मशिदीत नमाज अदा होत नाही आणि त्याची देखभालही केली जात नाही. अशा परिस्थितीत ऐतिहासिक महत्त्व असलेली ही मशीद जीर्ण अवस्थेत पोहोचली आहे.
शामली जिल्ह्यातील गौसगड गावाचा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे. येथे मुघल राजवटीत 1760 ते 1806 च्या दरम्यान एक समृद्ध सत्ताकेंद्र होते. सध्या, 300 वर्षांहून अधिक काळानंतर, एका जीर्ण झालेल्या मशिदीसह गौरवशाली भूतकाळाच्या काही खुणा येथे आहेत. गावात मुस्लिम नसल्यामुळे 1940 पासून या मशिदीत अजान, नमाज आणि दुआही झाली नाही. आता या जुन्या इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गावातील हिंदू पुढे सरसावले आहेत.

मशीद पर्यटनस्थळ बनवण्याची इच्छा : गौसगड गावात असलेली मशीद जतन करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते चौधरी नीरज रोडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी हाती घेतले आहे. सध्या ते गावचे सरपंच आहेत. नीरज रोडे यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, या मशिदीचे संरक्षण करणे आवश्यक आहे, यावर ग्रामपंचायतीचे सर्व 13 सदस्य एकमत आहेत. कारण, या परिसराचे महत्त्व दाखवून देणारा एकमेव वारसा म्हणून ही मशीद उरली आहे. त्यांनी सांगितले की, या ठिकाणी मशीद पाहण्यासाठी अनेक गाव आणि जिल्ह्यातील अनेक मुस्लिम येतात. याला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून रूपांतरित करण्यासाठी आम्ही आर्थिक बाबींवरही काम करत आहोत. त्यांनी सांगितले की, मशीद परिसर 3.5 बिघामध्ये पसरलेला आहे. परंतु त्यातील बहुतेक मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाले आहे, ज्यासाठी सर्व लोकांनी ते हटविण्यास सहमती दर्शविली आहे.
शेतकऱ्यांनीही दिली संमती : या ऐतिहासिक मशिदीजवळच गावातील शेतकरी संजय चौधरी यांचेही शेत आहे. त्यांनी सांगितले की, मशिदीची कोणतीही जमीन शेतकर्यांच्या शेतात आली तर सर्व शेतकरी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यास तयार आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपला जावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे. ही मशीद देशातील जातीय सलोख्याचे उदाहरण बनू शकते, असे शेतकऱ्याने सांगितले.

शासनाकडूनही मदतीची गरज : ग्रामपंचायत सदस्य शिवलाल यांनी सांगितले की, या ठिकाणी धूळ व माती साचली आहे. घटनास्थळी स्वच्छता राखण्यासाठी 50-60 ग्रामस्थांची टीम तयार करण्यात आली आहे. अनेक मुस्लिम या ठिकाणी मशीद पाहण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत या वारशाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. या कामात सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खजिन्याच्या शोधात अनेकदा खोदकाम : ग्रामस्थ अभिषेक कुमार यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी बाहेरचे लोक या ठिकाणी येत असत आणि खजिना शोधण्यासाठी रात्री खोदकाम करत असत. सकाळी गावकऱ्यांना खोल खड्डे पडलेले दिसत होते. खोल खोदकामामुळे मशिदीच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. मशिदीच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नीरज रोडे यांनी सांगितले. यानंतर अतिक्रमण हटवून परिसराची स्वच्छता करताना सीमा भिंत बनवली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठकही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.