न्यूयॉर्क : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाला फटकारत म्हटले आहे की, अदानी समुहाने त्यांच्या उत्तरात आम्ही उपस्थित केलेल्या प्रत्येक मुख्य आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. अदानी समूहाने त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना 413 पानांचा विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समुहाने हिंडेनबर्ग अहवालाला भारत आणि त्याच्या स्वतंत्र संस्थांवर हल्ला, असे म्हटले आहे. मात्र कळीच्या प्रश्नांना अदानींनी उत्तरच दिले नाही.
तार्किक उत्तरे दिली नाहीत : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानींच्या उत्तराचे खंडन करताना म्हटले आहे की, काही तासांपूर्वी अदानींनी 413 पानांचे उत्तर दिले. त्यांनी आमच्या आरोपांना तार्किक उत्तरे देण्याऐवजी उत्तरांना राष्ट्रवादाचा मुलामा चढवला. त्यांनी आमचा अहवाल हा भारतावर केलेला हल्ला असल्याचा दावा केला आहे. थोडक्यात अदानी समूहाने आपल्या यशाचा भारताच्या यशाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला, असे हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. हिंडेनबर्ग समुहाने म्हटले आहे की, अदानींच्या 413 पानांच्या उत्तरात आमच्या अहवालाशी संबंधित समस्यांवर फक्त 30 पाने आहेत. उर्वरित उत्तरात 330 पानांचे न्यायालयीन रेकॉर्ड, 53 पानांचे उच्च-स्तरीय आर्थिक, सामान्य माहिती आणि अप्रासंगिक कॉर्पोरेट उपक्रमांचे तपशील आहेत.
आमच्या प्रश्नांना टाळले : हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले की, आम्ही आमच्या अहवालात अदानी समूहाला 88 प्रश्न विचारले होते. अदानी त्यापैकी 62 प्रश्नांची उत्तरेच देऊ शकले नाहीत. अदानी यांनी फक्त स्वतःच्या फाइलिंगकडे लक्ष वेधले आणि प्रश्न किंवा संबंधित प्रकरणे निकाली काढल्याचे घोषित केले. ते आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना ठोसपणे उत्तर देऊ शकले नाहीत. हिंडेनबर्गने म्हटले आहे की, अदानींच्या उत्तराने आमच्या आरोपांची पुष्टी झाली आहे. त्यांनी आमच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.
हिंडेनबर्ग संशोधन अहवाल निराधार : हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यामध्ये त्यांनी अदानी समूहावर अनेक दशकांपासून अकाउंटिंग फसवणूक आणि स्टॉकमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. या अहवालानंतर अदानी समूहाच्या जवळपास 51 बिलियन डॉलर शेअर्सची विक्री झाली होती. अदानी समुहाने म्हटले आहे की, हा अहवाल अमेरिकन कंपनीला आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी खोट्या हेतूने प्रेरित आहे. त्यांनी हिंडेनबर्ग संशोधन अहवाल चुकीचा आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Hindenburg Research Adani : अदानी समूहावरील अहवालावर ठाम, कोणत्याही कायदेशीर कारवाईचे स्वागत - हिंडेनबर्ग