बिलासपूर (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका आठवीच्या विद्यार्थ्याने आपल्याच अपहरणाची अशी कहाणी रचली की पालकांपासून पोलिसांपर्यंत सर्वच अचंबित राहिले. जेव्हा अपहरणाचे सत्य समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. मुलाच्या या कृत्याचे कारणही खूप धक्कादायक आहे.
काय आहे प्रकरण : हे प्रकरण बिलासपूरच्या कोट कहलूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, दोन मुखवटा घातलेल्या बाईकस्वारांनी त्याला कशाचातरी वास घ्यायला लावून त्याचे अपहरण केले. मुलाच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा रस्त्यावर जाम लागला होता. या दरम्यान तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कसा तरी सुटला आणि घरी पळून गेला. घरी आल्यानंतर मुलाने संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवला : या प्रकरणी बिलासपूरचे डीएसपी राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवार 1 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली की, 31 जुलैच्या रात्री एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या मुलाचे अपहरण केले. मात्र त्यातून त्यांचा मुलगा कसा तरी जीव वाचवून घरी परतला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिस तपासात काय समोर आले : डीएसपीच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मुलाने सांगितलेल्या ठिकाणांची पाहणी केली. मुलाच्या मागावर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी गेले. या दरम्यान पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले आणि काही जबाबही नोंदवले. परंतु मुलाने सांगितलेली अपहरणाची कहाणी तपासात जुळत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासात मुलाचे कोणी अपहरण केले नसल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर शेवटी मुलानेच खरे काय ते सांगितले.
मुलाने हे पाऊल का उचलले? : या आठवीच्या विद्यार्थ्याने जुलै महिन्यात पावसाळ्याच्या सुट्टीचा गृहपाठ केला नसल्याचे सांगितले. पावसाळी सुट्टीनंतर 31 जुलै रोजी शाळा उघडली. मात्र गृहपाठ न केल्याने शिक्षकांच्या टोमण्याला घाबरलेल्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाची कहाणी रचली. खरं तर, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलाने अपहरणाबद्दल जे काही सांगितले त्याच्याशी संबंधित कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळेच पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी त्या दिशेने विचारपूस केल्यावर या विद्यार्थ्याचे बिंग फुटले.
हेही वाचा :