बंगळुरू Hijab Ban Row : कर्नाटक राज्य पोलीस आणि म्हैसूर जिल्हा पोलीस युनिट यांनी नांजनगुडू तालुक्यातील कावलंदे गावात बांधलेल्या कवलंदे, अंतरसंथे आणि जयपुरा पोलीस ठाण्यांचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी हिजाब बाबत मोठी घोषणा केलीय. राज्यात सध्या लागू असलेला हिजाब बंदीचा आदेश मागं घेण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री सिद्धारमैया यावेळी म्हणाले.
काय म्हणाले सिद्धरामैय्या : या कार्यक्रमात जनतेनं हिजाबबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, 'प्रत्येकजण हिजाब घालू शकतो. मी त्यावरील बंदीचे आदेश मागं घेण्यास सांगितलंय. मी धोतर-जुब्बा घालतो, तुम्ही पॅन्ट-शर्ट घालणार. यात काय चुकीचं आहे? मतांसाठी राजकारण करणं चुकीचं आहे." ते पुढं म्हणाले, "आपलं सरकार गरिबांसाठी काम करतंय. जनतेच्या कराच्या पैशातून आम्हाला आणि अधिकाऱ्यांना पगार मिळतो. सार्वजनिक सेवा हे आमचं पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळंच लोकांनी आम्हाला मतदान केलंय. आपण त्यांच्या पैशातून पगार घेत आहोत हे प्रत्येक अधिकाऱ्याला कळायला हवं, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
पोलिसांनीही दिला सल्ला : मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, "प्रत्येक पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांशी पोलिसांनी आदरानं वागलं पाहिजे. त्यांचं दुःख आणि व्यथा ऐका. हे लोकस्नेही पोलीस ठाणे झाले पाहिजे. पोलिसांनी सभ्य भाषा वापरायला शिकलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. चांगलं लोकाभिमुख पोलीस असतील तेव्हाच लोकांना शांततापूर्ण जीवन जगता येईल. पोलिसांनी दुर्बलांना कायद्याच्या माध्यमातून न्याय द्यावा," असंही मुख्यमंत्री म्हणाले. "काही ठिकाणी सातत्यानं अत्याचार होत आहेत. ज्यांच्याकडं पैसा आहे, त्यांनाच न्याय मिळतो, अशी भावना नसावी. पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांशी संगनमत करू नये," असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलाय.
भाजपा सरकारनं केली होती हिजाब बंदी : मागील भाजपा सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिजाब बंदीचा आदेश लागू केला होता. त्यानंतर देशभरात याबाबत चर्चा सुरु झाली. याविरोधात राज्यात अनेक आंदोलनंही झाली होती. एकंदरीतच भाजपा सरकारनं शैक्षणिक संस्थांमध्ये घातलेली हिजाब बंदी हटवण्याच्या दिशेनं कॉंग्रेस सरकार वाटचाल करत आहे.
हेही वाचा :