नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. दुसऱ्या कोरोना लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे म्हटलं जात असून ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात होते. यावर आज एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक नसल्याचे सांगितले.
देशात आतापर्यंत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट पसरली. या दोन्ही लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे तीसऱ्या लाटेतही मुलांना कोरोनाची बाधा होईल, असे वाटत नाही. तसेच यासंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, असे रणदीप गुलेरिया म्हणाले. तसेच मानसिक तणाव, स्मार्टफोनचं व्यसन, शिक्षण क्षेत्रातील अडचणी यांचा लहान मुलांवर मोठा परिणाम झाला आहे, असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
रणदीप गुलेरिया यांनी म्यूकरमायकोसिसवर भाष्य केले. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना म्यूकरमायकोसिसचा धोका आहे. जर स्वच्छता बाळगली तर त्यापासून बचाव करता येईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनातून रिकव्हर झालेल्या मधुमेह ग्रस्त लोकांना याचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या संसर्गाच्या उपचारात लवकर प्रारंभ होण्याचा फायदा आहे. म्यूकरमायकोसिस रुग्णाच्या जवळ बसल्याने किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांचा संसर्ग होत नाही, असेही त्यांनी सांगितले. रंगानुसार एकाच फंगसला भिन्न नावे देणे टाळण्याची गरज आहे. वेगवेगळ्या रंगांच्या नावांनी गोंधळ उडू शकतो, असेही त्यांनी म्हटलं.
फंगसची लक्षणे...
म्युकरमायकोसिस (फंगस)हा एक जंतूसंसर्ग आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुना असून आता मधुमेह असलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आता बळावत आहे. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशात नाक आणि सायनसमध्ये जंतूसंसर्ग वाढतो. नाक आणि सायनसची त्वचा खराब होऊन संसर्ग आणखी वाढतो. मग सायनसपासून तो डोळ्यांकडे पुढे मेंदूकडे जातो. यादरम्यान नाकात दुखणे, डोकेदुखी, डोळे दुखणे आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे सुरू होतात. ही लक्षणे असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घेत उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. केवळे यांनी सांगितले आहे.