चंदीगढ - हरयाणाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा विषाणू फुफुसात पोहचल्याने त्यांच्या छातीत संसर्ग वाढला आहे. त्यामुळे त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अंबाला येथील सिव्हील रुग्णालयात ते उपचार घेत होते. मात्र, जास्त त्रास होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात निर्णय घेण्यात आला होता. मेदांता रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार आता सुरू आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ओपी धनखड यांनी घेतली भेट
गृहमंत्री वीज यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष ओ. पी धनखड यांनी मेदांता रुग्णालयाला भेट दिली. रोहतक पीजीआय आणि एम्स रुग्णालयाचे पथक वीज यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली. अनिल वीज यांची प्रकृती सुधारत असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती, असे धनखड म्हणाले.