नवी दिल्ली - देशातील कोरोना परिस्थिती संदर्भात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रावरून राजकारण तापलं आहे. मनमोहनसिंग यांच्या पत्रावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. तुमच्या पक्षात तुमच्या सारखा विचार करणारे नेते कमी आहेत, असे हर्षवर्धन यांनी म्हटलं. देशात लसीकरण वेगाने करावे, असा सल्ला मनमोहनसिंग यांनी पत्रातून केला होता. त्यावर हर्षवर्धन यांनी उत्तर दिले, की देशात लसीकरणावर जोर दिला आहे. भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
भारताच्या लसीची चर्चा जगभरात होत आहे. साथीच्या रोगाविरूद्ध देशात दोन लसी आहेत आणि ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शास्त्रज्ञांचे साधे कौतूकही केले नाही. शास्त्रज्ञांचे आभार मानण्याऐवजी अनेक काँग्रेस नेते आणि काँग्रेस शासित राज्यांनी लसीच्या प्रभावाबद्दल अफवा पसरवल्या. यामुळे या लसीबाबत लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. अशाप्रकारे, आपल्या देशवासियांच्या जीवनासोबत खेळलं जात आहे. आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अफवा पसरवण्याच्या बाबतीत विश्वविक्रम केल्याचे दिसते, असे ते म्हणाले.
15 एप्रिल पर्यंत 10 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर सुमारे दीड कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. भारतात दररोज सरासरी 30 लाख लस डोस दिले जात आहेत, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.
लसी बनविणार्या कंपन्यांना निधी उपलब्ध करुन दिला -
आपल्या पक्षाने नकारात्मक गोष्टी पसरविल्या असूनही, आपले नाव पाहता आम्ही तुमच्या सूचना मोठ्या मानाने स्वीकारल्या आहेत. तुम्ही देशाचे हित लक्षात घेऊन या सूचना दिल्या आहेत, असे आम्ही गृहित धरतो. ज्या लोकांनी तुम्हाला पत्र लिहण्याची सूचना केली. त्या व्यक्तींनी तुम्हाला चुकीची माहिती दिली असून दिशाभूल केली. उदाहरणार्थ, तुम्ही लस आयात करण्याची सूचना केली आहे. मात्र, यापूर्वीच लस आयातीला मंजुरी दिली आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. तुमचे पत्र येण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्काळ उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने अनेक लसी बनविणार्या कंपन्यांना निधी उपलब्ध करुन दिला आहे, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र -
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. कोरोनाशी लढण्याचे मुख्य माध्यम म्हणजे देशात लसीकरण वाढविणे आहे. लसींच्या संख्येवर नव्हे तर देशाच्या लोकसंख्येनुसार लसीकरणाच्या टक्केवारीवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मनमोहनसिंग यांनी पत्रात म्हटले होते. सध्या भारताने देशातील काही लोकांनाच लस टोचवली आहे. योग्य योजनेमुळे आपण लसीकरण अधिक चांगले करू शकतो, अशी खात्री असल्याचे सिंग यांनी पत्रात म्हटले. तसेच 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांनाही लस टोचवण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले होते.
हेही वाचा - पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय सभा रद्द; राहुल गांधींचा कौतुकास्पद निर्णय