वाराणसी : भारतीय पुरातत्व विभागाकडून ज्ञानवापी परिसराचा सर्वे केला जात आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सर्वे करण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी एएसआयच्या पथकाने या मशिदीच्या परिसरातील मुख्य भवन आणि सभागृह, तळघराचे काटेकोरपणे निरीक्षण करण्यात आले.
वेळ का बदलण्यात आली : ज्ञानवापी परिसरातील सर्वेला दररोज सकाळी 8 पासून सुरुवात होत असते. परंतु आज सर्वे 11 वाजल्यापासून सुरू करण्यात आला आहे. कारण आज श्रावण सोमवार असल्याने विश्वनाथ मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. यामुळे एएसआयने सर्वे सुरू करण्याच्या वेळेत बदल केला. तर हिंदू आणि मुस्लीम पक्षातील लोकांना सकाळी साडेदहा वाजता मशिदीच्या आत जाण्यास परवानगी देण्यात आली.
परिसराची थ्रीडी इमेज : ज्ञानवापीच्या सर्व कानाकोपऱ्याचे निरीक्षण केले जाणार आहे. पुरातत्व विभागाकडून प्रत्येक कोपऱ्याचे फोटो घेत तेथे व्हिडिओग्राफी केली जात आहे. जीपीएसद्वारे ज्ञानवापीच्या परिसराचा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाकडून थ्री डी पद्धतीने मॅपिंग करण्याचे काम केले जात आहे. या पद्धतीचा उपयोग करण्यासाठी काशी विश्वनाथ धामच्या उंच इमारतीवर एक एंटेना लावण्यात आला होता. त्या एंटीनाची एक तार खाली असलेल्या काठीसारख्या मशीनला जोडण्यात आली आहे. त्यातून मिळणाऱ्या सिग्नलच्या मदतीने संपूर्ण परिसराची थ्रीडी इमेज लॅपटॉपवर तयार करण्यात आली आहे.
मशीदच्या घुमटाखाली आहे काय : संपूर्ण ज्ञानवापी मशिदीची लांबी, रुंदी, उंची आदी गोष्टींची नोंद केली गेली आहे. दरम्यान काल पुरातत्व विभागाकडून मशिदीच्या घुमटाचा तपास करण्यात आला. हिंदू पक्ष त्याला मंदिराचा कळस म्हणत आहे. मंदिराचे तीन कळस असून त्यावर घुमट तयार करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. दरम्यान याची शहानिशा करण्यासाठी सर्वे करणाऱ्या पथकाने घुमटावर थाप मारुन बघितली. थाप मारल्यानंतर तेथून ठपठप, असा आवाज येत होता. यामुळे या घुमटाखाली काय आहे, याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान 42 लोकांचे पथक ज्ञानवापीचा सर्वे करत आहे. हे पथक 4 तुकड्यामध्ये विभागण्यात आले आहे. या तुकड्या वेगवेगळ्या भागाची तपासणी करत आहेत. यातील अनेकजण राम जन्मभूमीच्यावेळी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये सहभागी होते.
हेही वाचा-