गांधीनगर - मुलींचे सौंदर्य हे लांब केसांनी आणखी खुलून दिसते, असे म्हटले जाते. मात्र, लांब केसांची काळजीही तितकीच घ्यावी लागते. अरवली जिल्ह्यातील मोडासामध्ये अशी एक मुलगी राहते की जिच्या नावावर लांब केसांचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. निलांशी पटेल नाव असलेल्या या मुलीने सलग तीन वेळा सर्वांत लांब केस असण्याचा मान मिळवला आहे. सध्या निलांशीच्या केसांची लांबी 6.2 फूट आहे.
सलग तीनदा झाली विक्रमाची मानकरी -
निलांशी जगातील सर्वांत लांब केस असलेली किशोरवयीन मुलगी आहे. 2018 मध्ये पहिल्यांदा तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत लांब केसांचा विक्रम तिच्याच नावावर आहे. तीन वर्षात तिचे केस एका फूटांनी वाढले आहेत.
अभ्यासातही आहे हुशार -
आपल्या लांब आणि सुंदर केसांसाठी ओळखली जाणारी निलांशी अभ्यासातही हुशार आहे. जेईई अॅडव्हान्स परिक्षेत संपूर्ण देशात तिने १०७वी रँक मिळवली होती. त्यानंतर तिने आयआयटी गांधीनगरमध्ये केमिकल इंजीनियरिंगसाठी प्रवेश घेतला आहे. इतकेच नाही तर ती टेबल टेनिसची राष्ट्रीय खेळाडू देखील आहे. त्यामुळे तिला 'ब्यूटी विथ ब्रेन' असे म्हटले जाते.