सूरत : तंत्रज्ञानाच्या जोरावर दिवसेंदिवस स्मार्ट होत चाललेल्या नव्या पिढीतील भाऊ-बहिणींसाठी हटके स्मार्ट राखीचा पर्याय गुजरातमधील एका युवतीने उपलब्ध करून दिला आहे. आयुषी देसाई असे या युवतीचे नाव असून वेगवेगळ्या कस्टमाईज्ड संदेशांचा समावेश असणाऱ्या क्युआर कोडची खास राखी ती ग्राहकांना तयार करून देत आहे. तिच्या या भन्नाट कल्पनेला केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत असून ती परदेशातही ही राखी निर्यात करत आहे.
क्युआर कोड असलेली स्मार्ट राखी
व्यवसायाने वास्तुविशारद असलेली आयुषी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर क्युआर कोड असलेली स्मार्ट राखी ग्राहकांना तयार करून देत आहे. आपल्या भावासाठीचा संदेश, त्याला डेडिकेट करण्यासाठी एखाद्या गाण्याची लिंक याचा क्युआर कोड असलेली राखी ती तयार करून देते. हा क्युआर कोड मोबाईल किंवा कम्युटरवर स्कॅन केल्यास तो संदेश किंवा संबंधित लिंक यात उघडली जाते.
देशासह परदेशातूनही चांगली मागणी
या क्युआर कोड राखीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयुषीचे म्हणणे आहे. काश्मीर, तेलंगाणा, आसामसह अमेरिका आणि कॅनडातूनही या राख्यांना मागणी असल्याचे तिने सांगितले. देशासह परदेशातील ग्राहकांनाही आपण या राख्या पाठविल्याचे आयुषीने सांगितले आहे.
वेगवेगळ्या डिझाईनमध्ये राख्या उपलब्ध
ग्राहकांना क्युआर कोडच्या राखी वेगवेगळ्या डिझाईनमध्येही उपलब्ध असल्याचे आयुषीने सांगितले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून रक्षाबंधनाचा सण स्मार्ट रितीने साजरा करण्याच्या आयुषीच्या कल्पनेला चांगला प्रतिसाद तर मिळतच आहे. शिवाय तिचे यासाठी कौतुकही होताना दिसत आहे.
हेही वाचा - 'ती' व्हायरल जाहिरात खरंच बुर्ज खलिफावर चित्रित झाली का? एमिरेटसने दिले उत्तर