अहमदाबाद : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सुवर्णस्वप्न सत्यात साकारणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होतोच आहे. याशिवाय या यशाचा आनंद देशातील नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसत आहेत. नीरजच्या यशाचे कौतुक करताना गुजरातमधील काही पेट्रोल पंप चालकांनी नीरज नाव असलेल्या ग्राहकांना मोफत पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. तर गिरनार रोपवेची राईडही नीरज नाव असलेल्यांना मोफत मिळणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील एका रेस्टॉरंटनेही नीरज नाव असलेल्यांना मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे.
नीरज नाव असलेल्यांना मोफत पेट्रोल
भरूचमधील नेत्रांगमधील एका पेट्रोल पंप चालकाने नीरज नाव असलेल्या ग्राहकांना 501 रुपयांचे पेट्रोल मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यासंबंधीचा बोर्डही या पेट्रोल पंपावर लावण्यात आला आहे. नीरज नाव असल्याचे ओळखपत्र दाखवायचे आणि 501 रुपयांचे पेट्रोल अगदी मोफत घेऊन जायचे अशी ही योजना आहे. मात्र आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कारण 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही योजना सुरू होती.
फ्री रोपवे राईड
जुनागडमधील उडन खटोला रोपवेची राईडही नीरज नाव असेल्यांना अगदी मोफत मिळणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. नीरजच्या यशाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने ही अनोखी योजना आम्ही राबविल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटकमधील रेस्टॉरंटकडून मोफत जेवण
कर्नाटकच्या उत्तर कन्नडामधील शिराळीजवळ असलेल्या ताम्र या रेस्टॉरंटने नीरज नाव असलेल्या ग्राहकांना मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही योजना राहणार आहे. सोशल मीडियावरून ताम्रने याची घोषणा केली आहे.
हेही वाचा - नीरज चोप्राचा सन्मान; देशात दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार