अहमदाबाद : कोरोनावरील उपचारासाठी किंवा कोरोनापासून संरक्षण म्हणून कित्येक लोक सध्या गाईच्या शेणाने अंघोळ करताना दिसून येत आहेत. असे केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते असा दावा हे लोक करत आहेत. मात्र, गुजरातच्या डॉक्टरांनी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. आपल्या शरीरावर गाईचे शेण लावून घेतल्यामुळे म्युकरमायकोसिस सारखा गंभीर आजारही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
अहमदाबादमधील श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्ववैद्य प्रतिष्ठानच्या गोशाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही लोक जात होते. याठिकाणी हे लोक कथित 'काऊ डंग थेरपी' घेत होते. गाईच्या शेणाचा लेप शरीराला लावल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून, कोरोनापासून बचाव होऊ शकतो असा या लोकांचा दावा आहे. हे लोक शेणाचा लेप लावून, काही वेळाने तो गाईच्या दुधाने धुवून काढत. ही प्रक्रिया करण्यासाठी कित्येक अत्यावश्यक कर्मचारीही येत होते, अशी माहिती गोशाळा प्रशासनाने दिली.
दरम्यान, डॉक्टरांनी मात्र हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. गाईचे शेण हा तिच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ असतो. याचा वापर केल्यामुळे कोरोना होत नाही असे कुठेही सिद्ध झाले नाही असे मत डॉ. दिलीप मावलनकर यांनी व्यक्त केले. दिलीप हे गांधीनगरमधील भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक आहेत.
तर शहरातील वरिष्ठ डॉक्टर मोना देसाई यांनी ही थेरपी अगदीच अवैज्ञानिक आणि बोगस असल्याचे म्हटले आहे. देसाई या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला विंगच्या पदाधिकारी आहेत. गायीच्या शेणामुळे फायदा सोडा, उलट तुम्हाला म्युकरमायकोसिस सारख्या बुरशीजन्य आजारांचीही लागण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा : उन्नावमध्ये गंगेकिनारी वाळूतच पुरले जातायत मृतदेह; आता त्यासाठीही जागा नाही शिल्लक