गांधीनगर : गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसांमध्ये आठ मृतदेह आढळून आले आहेत. हे सर्व मृतदेह 'तौक्ते' चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात बुडालेल्या 'बार्ज पी३०५' वरील कर्मचाऱ्यांचे असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवार-रविवार अशा दोन दिवसांमध्ये हे मृतदेह आढळून आले आहेत. या आठ मृतदेहांपैकी दोघांची ओळख आधार कार्डच्या माध्यमातून पटली आहे. इतर मृतदेहांचे कपडे आणि लाईफ जॅकेट यावरुन हे बार्जवरील कर्मचारी असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी वलसाड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
शोधमोहीम अजूनही सुरू..
तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या बार्ज पी305 वरील कर्मचाऱ्यांचे बचाव व मदत कार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत बार्ज पी ३०५ वरील 188 जणांचे प्राण वाचविण्यात आले असून, 70 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागलेले आहेत. यातील 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी आढळून आलेले असून; आणखी 8 कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुजरातमधील वलसाड येथे मिळून आले आहेत.
आतापर्यंत 48 मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले आहे. इतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी त्यांची डीएनए चाचणी केली जात आहे. नौदलाकडून पी 305 बार्ज व टग बोट वरप्रदा या बुडालेल्या दोन बोटींवर खास डायव्हर्सकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र पी305 वर शोध मोहीम पूर्ण झालेली असून कुठलाही मृतदेह मिळून आलेला नाही.
हेही वाचा : 'कृपया काहीतरी करा, किंवा राजीनामा तरी द्या'; मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना आवाहन