अहमदाबाद (गुजरात): गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चे (Gujarat elections 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडत आहे. या मतदानामुळे 69 महिला उमेदवार आणि 719 पुरुष उमेदवार मिळुन एकुण 788 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गुजरात विभानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणाऱ्या 'सौराष्ट्र' (Saurashtra voters) प्रदेशाचा समावेश पहिल्या टप्प्यात होत असल्याने, पहिल्या टप्प्यातील मतदारांचा कौल निर्णायक मानला जात आहे.
एकूण 19 जिल्ह्यांमध्ये मतदान : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी मतदान होणार आहे. अमरेली, भरूच, भावनगर, बोताड, डांग, देवभूमी द्वारका, गिर सोमनाथ, जामनगर, जुनागढ, कच्छ, मोरबी, नर्मदा, नवसारी, पोरबंदर, राजकोट, सुरत, सुरेंद्रनगर, तापी आणि वलसाड हे 19 जिल्हे पहिल्या टप्प्यातील मतदान करतील.
19 जिल्ह्यांतील विशेष जागा : जसदनमधील कुंवरजी बावलिया, मोरबीतील कांती अमृतिया, पोरबंदरमधील बाबू बोखिरिया, तलाला येथील भगवान बरड, भावनगर परसोतम सोलंकी, जामनगर उत्तर रिवाबा जडेजा, वराछा येथील किशोर हे 19 जिल्ह्यांतील 89 जागांपैकी महत्वाचे उमेदवार आहेत. कतारगाममधून गोपाल इटालिया, जामखंभालियातून इशुदान गढवी आणि वराछामधून अल्पेश कथिरिया हे आम आदमी पक्षाचे खास उमेदवार असणार आहेत. तर अमरेलीमधून परेश धनानी आणि लाठीमधून वीरजी थुमर काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
एकूण मतदारांची संख्या : सौराष्ट्र-कच्छमधील 54 जागांवर 2,39,76,670 नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये 1,24,33,362 पुरुष आणि 1,15,42,811 महिला मतदार आहेत.
एकूण मतदान केंद्रे : (Polling Stations) सर्व 89 जागांसाठी 25,371 मतदान केंद्रे आहेत. हे लक्षात घेण्याजोगे आहे की, सुरतची चौर्यशी विधानसभा राज्यातील सर्वात मोठी विधानसभा आहे. या क्षेत्रात सर्वात जास्त 526 मतदानाची केंद्रे आहेत.
भाजप,आप आणि काँग्रेमध्ये लढत : (Fight between BJP AAP and Congress) गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी, भाजप,काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रत्येकी 182 जागांवर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काही छोट्या पक्षांनी काही ठराविक जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या फेरीत भाजप 89, बसपा 57, काँग्रेस 89, आम आदमी पार्टी 88 जागांवर निवडणुक लढवत आहे.
सुरक्षा व्यवस्था : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सुमारे 700 तुकड्या तैनात आहेत. यामध्ये 70,000 कर्मचार्यांचा समावेश आहे. उच्च सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे.