कानपूर - जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी घाटमपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात भदरस गावात एका सात वर्षीय बालिकेचा मृतदेह काली मंदिराजवळ छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून ग्रामस्थांनी आरोप केला, की बालिकेचे अपहरण करून काळ्या जादूसाठी तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
भदरस गावात करन कुमार आपल्या कुटूंबासह राहतात. शनिवारी दिवाळी दिवशी संध्याकाळच्या सुमारास शाम यांची सात वर्षीय मुलगी श्रेया दुकानला गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नसल्याने कुटूंबीयांनी तिचा शोध सुरु केला. रात्री उशिरापर्यंत ती सापडली नाही.
काली मंदिर परिसरात छिन्न-विछिन्न अवस्थेत मिळाला मृतदेह -
आज (रविवार) सकाळी शेतात जाणाऱ्या लोकांनी काली मंदिराजवळ एक बालिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. मुलीची निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती व तिच्या शरीरातील अवयव गायब होते. घटनेची माहिती मिळताच कुटूबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मुलीच्या शरीरातील अवयव गायब -
पोलिसांनी ग्रामस्थांना शांत केले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी डॉग स्क्वॉड व फोरेंसिक टीमच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे, की मुलीच्या शरीरातील अनेक अवयव काढून घेण्यात आले आहेत. यामुळे ही हत्या जादू-टोण्यातून केल्याचा संशय आहे.