उदयपूर (राजस्थान) : भारताने G20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये सिटी पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये सोमवारी पहिली 4 दिवसीय G20 शेर्पा बैठक (G20 Sherpa Meeting) सुरू झाली. (G20 Sherpa meeting begin in Udaipur). सकाळी साडे आठ वाजता कडेकोट बंदोबस्तात ही बैठक सुरू झाली. या बैठकीत सहभागी देशांचे राजदूत G20 राष्ट्रांना भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर विचारमंथन करतील.
बैठकीची रुपरेषा : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, G20 शेर्पा अमिताभ कांत बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. यानंतर अर्थ मंत्रालयातील अर्थशास्त्र विभागाचे सचिव अजय भाई सेठ यांचे सादरीकरण होईल. बैठकीत प्रतिनिधी तांत्रिक परिवर्तन, हरित विकास, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, SDGs च्या अंमलबजावणीला गती देणे या सह काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर संभाषण करतील. पहिली शेर्पा बैठक भविष्यातील बैठकांसाठी टोन आणि अजेंडा सेट करेल. शेर्पा बैठकीमुळे भारताला त्याच्या व्यापक प्राधान्यक्रमांची रूपरेषा आणि G20 अध्यक्षपदाचा आढावा घेण्याची संधी मिळेल. या शेर्पा बैठका प्रमुख मुद्द्यांवर एकमत प्रस्थापित करण्यासाठी कार्य करतील. यात विविध G20 कार्यप्रवाहांमध्ये चर्चा केली जाईल. प्रतिनिधी जग मंदिर पॅलेसमध्ये डिनर करतील जेथे 'कलर्स ऑफ राजस्थान' या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला जाईल. शेर्पा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी उदयपूर सिटी पॅलेसच्या मानक चौकात भारतातील विविध कलाप्रकारांचे दर्शन घडवणारा कार्यक्रम होणार आहे.
G 20 चे अध्यक्षपद भारतासाठी संधी : भारताने 1 डिसेंबर रोजी औपचारिकपणे इंडोनेशियाकडून G20 चे अध्यक्षपद स्वीकारले. G20 किंवा ग्रुप ऑफ ट्वेंटी हा जगातील 20 प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक मंच आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम "वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य," अशी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रीलिझनुसार भारत आपल्या अध्यक्षपदाच्या काळात, 32 वेगवेगळ्या कार्यप्रवाहांमध्ये 50 हून अधिक शहरांमध्ये 200 हून अधिक बैठका आयोजित करेल. या व्यतिरिक्त भारताला G20 चे प्रतिनिधी आणि पाहुण्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दाखवण्याची देखील संधी मिळेल.