जयपूर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यामध्ये गुरुवार एक चार वर्षांचा मुलगा बोरवेलच्या खड्ड्यात पडला होता. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. सध्या या मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून, डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी हिरवा कंदील देताच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल.
२० तास चालले रेस्क्यू ऑपरेशन..
गुरुवारी हा मुलगा खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच एसडीआरएफने बचाव मोहीम सुरू केली होती. त्यानंतर एनडीआरएफचे एक पथकही याठिकाणी दाखल झाले होते. सर्वप्रथम एका छोट्या पाईपच्या मदतीने या मुलाला ऑक्सिजन पुरवण्यात आला. तसेच, दोरीच्या सहाय्याने या मुलापर्यंत बिस्कीट आणि पाण्याची बाटली पोहचवण्यात आली. या मुलाचे व्हिडिओ चित्रीकरणही सुरू होते, जेणेकरुन त्याच्या स्थितीवर लक्ष ठेवता येईल. तब्बल २० तास हे रेस्क्यू ऑकपरेशन चालले.
एनडीआरएफ-एसडीआरएफ झाले फेल; देसी जुगाड आले कामी..
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांनी अथक प्रयत्न करुनही या मुलाला बाहेर काढता आले नाही. त्यानंतर रात्री उशीरा माधाराम नावाच्या एका व्यक्तीने शक्कल लढवली. त्याने ९० फूट लांबीच्या तीन पाईप या खड्ड्यात सोडल्या. या तीनही पाईप्सच्या पुढील भागात दोरी बांधण्यात आली. जेव्हा पाईप अनिलपर्यंत पोहोचल्या, तेव्हा त्याला उभे राहण्यास सांगण्यात आले. अनिल उभा राहताच, माधारामने पाईपच्या खालच्या भागात बांधलेली रस्सी ओढली, ज्यामुळे हे तीन पाईप एकमेकांना जोडले गेले आणि अनिल यामध्ये अडकला. यानंतर हे तीन पाईप हळूहळू वर ओढले गेले. या पाईप्ससोबत त्यांमध्ये अडकलेला अनिलही सुखरुप बाहेर आला.
असा पडला ९० फूट खोल खड्ड्यात..
अनिल देवासी असे या मुलाचे नाव आहे. जालोरमधील लाछडी गावात नगाराम देवासी यांच्या शेतामध्ये बोरवेल खणण्यात आली होती. तब्बल ९० फूट खोल अशा या बोरवेलच्या खड्ड्याला लोखंडाच्या तारांनी झाकण्यात आले होते. मात्र, याठिकाणी खेळायला गेलेल्या अनिलने बोअरवेलवरील लोखंडी तारा काढून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो बोअरवेलमध्ये कोसळला.
हेही वाचा : मोदींचा फोन म्हणजे केवळ 'मन की बात'; झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांची टीका