गाजीपूर ( उत्तर प्रदेश ) - सादत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील चार ( Four People Died In Family ) जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आधी पत्नी व मुलांची हत्या केल्यानंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवदास सोनकर (वय 36), राहुल सोनकर (6) आणि मुलगी तेजल सोनकर (4), शिवदास यांची पत्नी रीना सोनकर अशी मृतकांची नावे आहेत.
कौटुंबिक वादातून घटना घडल्याची शक्यता - सादत शहरातील वॉर्ड दोनमध्ये राहणारा शिवदास सोनकर हा रेल्वे स्टेशनवर हातगाडी लावायचा. सुमारे आठ वर्षांपूर्वी रीना हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. त्यांना मुलगा राहुल (6) आणि मुलगी तेजल (4) आहे. दोघांचेही वारंवार वाद होत होते. त्यामुळे त्यांची पत्नी जवळपास वर्षभर माहेरी होती. दहा दिवसांपूर्वी आई-वडिलांनी समजावून सांगितल्यानंतर ती परत आली होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर सकाळी 7.30 वाजेपर्यंत दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता शिवदास खोलीत लटकलेला दिसला. त्याच्याजवळ पत्नी आणि दोन मुलांचा मृतदेह आढळून आला.