लखनऊ : बालगृहातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना लखनऊच्या प्राग नारायण रोडवरील राजकीय बालगृहात उघड झाली आहे. याप्रकरणी बालगृहाच्या अधिक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. अंतरा, लक्ष्मी, आयुषी आणि दिपा असे मृत्यू झालेल्या चार चिमुकल्यांची नावे आहेत. थंडीमुळे या चिमुकल्यांचा निमोनियाने मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
न्यायालयीन चौकशी: डिसेंबर आणि जानेवारीमध्ये योग्य देखभाल न झाल्यामुळे चार चिमुकल्यांचे स्थिती खराब झाली. यामुळे थंडीने या चिमुकल्यांना निमोनिया झाला. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या चिमुकल्यांना थंडीपासून बचावासाठी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे डीपीओ विकास सिंह यांनी या चिमुकल्यांचे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. त्यासह याप्रकरणी बालगृह अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेशही विकास सिंह यांनी दिले आहेत. विकास सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावत या प्रकरणाचा तात्काळ अहवाल मागितला आहे. त्यासह बालगृहाच्या देखभालीसाठी दिनेश रावत यांची प्रभारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
निमोनियाने मृत्यू : राजकीय बालगृहातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या चिमुकल्यांचा मृत्यू निमोनियाने झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सिव्हील रुग्णालयात मंगळवारी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर बाकीच्या चिमुकल्यांनी 10 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान शेवटचा श्वास घेतला. सिव्हील रुग्णालयात एका चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत. सिव्हील रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर पी सिंह यांनी या मुलांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या चिमुकल्यांना केजीएमयू कक्षात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेऊन उपचार करत होते. चिमुकल्यांच्या उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा करण्यात आला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाल आयोगाने घेतली दखल : डीपीओ विकास सिंह यांनी बालगृहाचे अधिक्षक किंशुक त्रिपाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बुधवारपर्यंत आपले म्हणने मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही त्यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. चिमुकल्यांच्या उपचारात बालगृहाच्या वतीने कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत आहे. आजारी असल्यानंतर तात्काळ चिमुकल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरीही चिमुकले का वाचू शकले नाहीत, हे फक्त डॉक्टरच सांगू शकतील असेही विकास सिंह यांनी यावेळी सांगितले. मात्र त्यानंतर राज्य बाल अधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या अनिता अग्रवाल यांनी बालगृहाला भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बालगृहाच्या अधिक्षकांची चांगलीच कानउघडणी केली. त्यांच्या सोबत बालकल्याण समिती अध्यक्ष रविंद्र जादौन यांनीही बालगृहाचे निरीक्षण केले. चिमुकले आजारी असल्याबाबतची माहिती देण्यात न आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण : राजकीय बालगृहात अंतराला या दहा ते पंधरा दिवसाच्या चिमुकलीला दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा 10 फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यापूर्वी 19 ते 28 जानेवारीला भरती करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये 15 दिवसांच्या लक्ष्मीला बालगृहात आणले होते. ती आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 23 जानेवारीला तिची तब्येत बिघडल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 11 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. आयुषी ही बालगृहात आणली तेव्हा ती 16 दिवसाची होती. तिलाही केजीएमयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिचा 12 फेब्रुवारीला तिने शेवटचा श्वास घेतला. दीपाला दाखल केले, तेव्हा ती 20 दिवसाची होती. मात्र तिला निमोनियाने ग्रासले होते. 23 जानेवारीला तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी तिनेही अखेरचा श्वास घेतला. दीड महिन्याच्या मूनवर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Air India Boeing Deal : एअर इंडिया-बोईंगच्या करारामुळे भारत व अमेरिकेतील व्यावसायिक भागीदारी मजबूत होईल