रायपूर Bhupesh Baghel Father : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांचं निधन झालं आहे. सोमवारी (8 जानेवारी) सकाळी 6 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते.
तीन महिन्यांपासून तब्बेत खराब होती : नंदकुमार बघेल यांची तब्बेत गेल्या तीन महिन्यांपासून खराब होती. ते रायपूरच्या बालाजी रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भूपेश बघेल दिल्लीत असून ते दुपारपर्यंत रायपूरला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहायचे : छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील कुरुड-दी गावचे मूळ रहिवासी असलेले नंदकुमार हिंदू समाजातील जातीयवादा विरोधात नेहमीच आवाज उठवत असत. 1970 च्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत राहायचे. नंदकुमार बघेल यांना 2021 मध्ये ब्राह्मणांविरुद्ध आपत्तीजनक वक्तव्य केल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं.
रावणाच्या पुतळ्याचं दहन न करण्याची मागणी : नंदकुमार बघेल यांनी 2001 मध्ये 'ब्राह्मण कुमार रावन को मत मारो' नावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाद्वारे त्यांनी रावणाच्या पुतळ्याचं दहन न करण्याची मागणी केली होती. यानंतर छत्तीसगडमध्ये जनक्षोभ निर्माण झाला. तेव्हा अजित जोगी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राज्य सरकारनं या पुस्तकावर बंदी घातली होती. नंदकुमार यांनी राजकारणात फारसा सक्रिय सहभाग घेतला नाही. त्यांनी 1980 च्या दशकात एकदाच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुका लढवल्या. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.
हे वाचलंत का :