गंगटोक (सिक्कीम) 23 Army Jawan Missing : सिक्कीमच्या लाचेन खोऱ्यातील तिस्ता नदीला आलेल्या पुरात बुधवारी सकाळी सैन्याचे २३ जवान बेपत्ता झाले. तसेच सैन्याची काही वाहनं अचानक आलेल्या पुरात बुडाली आहेत. जवानांना शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सैन्याचे २३ जवान बेपत्ता : मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाजवळ बुधवारी सकाळी ढगफुटी झाली. त्यामुळे तलावाला पूर येऊन संपूर्ण परिसर जलमय झाला. सैन्याच्या अनेक कॅम्प्सलाही या पुराचा फटका बसला आहे. पुरामुळं सैन्याचे सुमारे २३ जवान बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी रात्री तिस्ता नदीचं पाणी अचानक वाढल्यानंतर सिक्कीम प्रशासनानं रहिवाशांसाठी हाय अलर्ट जारी केला होता. स्थानिक लोकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये तिस्ता नदीजवळील रस्त्याचा मोठा भाग पाण्याच्या जोरदार प्रवाहानं वाहून गेल्याचं दिसत आहे.
पाण्याची पातळी सतत वाढत आहे : बुधवारी सिक्कीमच्या उत्तर आणि पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये अचानक पूर आला. मंगळवार रात्रीपासून सिक्कीमच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर सिक्कीममधील चुंगथांगमध्ये आलेल्या महापूरानंतर नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. उत्तर सिक्कीममध्ये अचानक पूर आला असून त्यामुळे तिस्ता नदीच्या पाणलोट क्षेत्रात चिंता निर्माण झाली आहे.
नदीकाठच्या लोकांना घर सोडण्याचा सल्ला : गजोलडोबा, डोमोहनी, मेखलीगंज आणि घिश या सखल भागांना या पुराचा फटका बसू शकतो. उत्तर सिक्कीममधील चुंगथांग शहराला जोडणारा पूल खराब झाल्यामुळं त्याच्या आसपासच्या भागांवरही परिणाम झाला आहे. सर्व रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, सखल भागातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय. तिस्ता नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांनाही सुरक्षिततेसाठी घर सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा :