गुवाहाटी : आसाममध्ये पुराने कहर केला असून तेथील परिस्थिती अजून गंभीर आहे.. तेथील सहा जिल्ह्यातील 29 हजार लोकांना या पुराचा फटका बसला असल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील संततधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. लखीमपूर, धेमाजी, कामरूप, दिब्रुगढ, कचर, नलबारी आणि इतरांसह 10 महसूल मंडळांतर्गतील 25 गावे आणि इतर भाग जलमय झाले आहेत.
पीक जमीन पाण्याखाली : आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) पुराच्या अहवालानुसार, पुराच्या पाण्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यांतील 215.57 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. एकट्या लखीमपूर जिल्ह्यात 1 हजार 215 मुलांसह 23 हजार 516 जण बाधित झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, पूरग्रस्त लखीमपूर जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाने तीन मदत वितरण केंद्रे स्थापन केली आहेत. पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. कोंबड्यांसह एकूण 6 हजार 307 जनावरांनाही पुराचा फटका बसला आहे.
तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट : गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे कछार आणि कामरूप जिल्ह्यात काही भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. गुवाहाटीस्थित प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) बुधवारी ईशान्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. यासोबतच तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, त्यानंतर दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला होता. पुरामुळे धेमाई, विश्वनाथ, गोलपारा आणि लखीमपूर या चार जिल्ह्यातील बंधारे आणि चार रस्ते खराब झाले आहेत. येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले होते की, बंगालच्या उपसागारतून येणाऱ्या कमी-पातळीच्या दक्षिण आमि नैऋत्य वाऱ्यांमुळे ओलावा कायम राहील. यामुळे 15 जूनपर्यंत संततधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
हेही वाचा -