नवी दिल्ली : सरकारने देशाचा ध्वज संहिता ( Flag Code of India 2002 ) बदलली असून त्याअंतर्गत आता दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली ( Tricolour now stay hoisted day night ) आहे. तसेच आता पॉलिस्टर आणि मशिनने बनवलेला राष्ट्रध्वजही वापरता येणार आहे. 'आझादी का अमृत महोत्सव' ( Azadi Ka Amrit Mahotsav ) अंतर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' कार्यक्रम ( Har Ghar Tiranga campaign ) सुरू करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल पुढे आले आहे.
आदेशामध्ये केली सुधारणा : केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन, फडकवणे आणि वापर हे भारतीय ध्वज संहिता, 2002 आणि राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत येतात. पत्रानुसार, भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये 20 जुलै, 2022 च्या आदेशाद्वारे सुधारणा करण्यात आली आहे. आता भारतीय ध्वज संहिता 2002 च्या भाग II च्या पॅरा 2.2 चे खंड (11) आता असे वाचले जाईल. त्यानुसार 'कुठे ध्वज उघड्यावर प्रदर्शित केला जात असेल किंवा नागरिकांच्या निवासस्थानी प्रदर्शित केला असेल तर तो रात्रंदिवस फडकता येणार आहे'.
असे झाले बदल : यापूर्वी फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकवण्याची परवानगी होती. त्याचप्रमाणे, ध्वज संहितेच्या दुसर्या तरतुदीत अशी सुधारणा करण्यात आली की, 'राष्ट्रध्वज हाताने कातलेला आणि हाताने विणलेला किंवा यंत्राने बनलेला असेल. तो कापूस/ पॉलिस्टर/ लोर/ रेशीम किंवा खादीपासून बनवला जाईल. याआधी यंत्राने बनवलेले आणि पॉलिस्टरने बनवलेले राष्ट्रध्वज वापरण्यास परवानगी नव्हती.
हेही वाचा : २२ जुलै : भारतीय ध्वज स्वीकृती दिन