रांची/घाटशिला (झारखंड) Five elephants died due to electrocution : झारखंडमध्ये पूर्व सिंहभूममधील घाटशिलामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मुसाबनी वनपरिक्षेत्रातील उपरबंध गावाजवळ विजेचा धक्का लागून पाच हत्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका हत्तीच्या पिलाचाही समावेश आहे. सोमवारी संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. मंगळवारी सकाळी स्थानिकांनी मृत हत्ती पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचं पथक लगेच घटनास्थळाकडे रवाना झालं.
हत्तींच्या कळपाला विजेचा धक्का कसा बसला : या हत्तींना विजेचा धक्का नेमका कसा बसला असा प्रश्न विचारण्यात येत आहे. वनविभागाच्या खबरदारीच्या उपायालाच हे हत्ती बळी पडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. गावातील जनावरे वनक्षेत्रात जाऊ नयेत यासाठी वनविभागानं खंदक तयार केला होता, असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं. मात्र हत्तींचा कळप हा खंदक ओलांडत होता. त्यादरम्यान एका हत्तीची सोंड 33 हजार केव्हीच्या विद्युत तारेच्या संपर्कात आली. पहिल्या हत्तीला विजेचा झटका बसताच त्याचा मृत्यू झाला. त्या पाठीमागून येणाऱ्या इतर चार हत्तींनाही विजेचा धक्का बसला. हे सगळे हत्ती एकमेकांच्या अगदी जवळ होते. त्यामुळे असं झालं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विजेचा जोरदार झटका बसला, यामुळे सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
हत्तींचा दुसरा कळप संतप्त : या अपघातानंतर वनविभागाचं पथक तेथून मृत हत्तींचे मृतदेह उचलण्यासाठी आलं. मात्र त्यांना इतर हत्तींच्या कळपामुळं जवळ जाता आलं नाही. कारण या पथकातील लोक जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागल्यावर, इतर हत्तींचा कळप त्यांच्यावर हल्ला करत होता. काही पत्रकारांनी या घटनेचा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. कसं तरी पत्रकारांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मृत हत्तींभोवती इतर हत्तींचे आणखी तीन कळप घिरट्या घालत असल्याचं प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं. एका कळपात दोन हत्ती आहेत, तर दोन कळपात प्रत्येकी तीन हत्ती असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
कोठे वीज पुरवठा केला जातो : वास्तविक, मुसाबनी डीव्हीसी प्लांटमधून हिंदुस्थान कॉपर लिमिटेडला वीज पुरवठा केला जातो. उच्च व्होल्टेजची विद्युत तार मुसाबनी येथून मौभंदर येथील प्लांटपर्यंत जाते. वायरची उंची चांगलीच जास्त आहे. मात्र खंदकातून जाताना हत्तींच्या कळपाचा विद्युत तारेशी संपर्क नेमका कसा आला हे कोडंच आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यांना याची भीती वाटत आहे की, इतर हत्तींचे कळप जवळपासच्या गावात उच्छाद तर मांडणार नाहीत ना.
हेही वाचा...