जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट भाग राष्ट्राला समर्पित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी 18100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यानंतर दौसा जवळील धनावद विश्रामगृहात आयोजित सभेद्वारे गुर्जर-मीणा समाजाचे भाजपच्या बाजूने मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उद्घाटनानंतर मोदींची सभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 2.45 वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने थेट दौसा येथील धनावद येथे पोहोचतील. यानंतर ते तीन वाजता एक्स्प्रेसवेचे उद्घाटन करतील. तर रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे रस्ता मार्गाने दौसा येथे पोहोचतील. एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी जवळच्या विश्रांती क्षेत्रात आयोजित सभेला संबोधित करतील. सभेला 2 लाखांहून अधिक लोक जमणार असल्याचा दावा भाजप करत आहे. सभेतील भाषणानंतर मोदी हेलिकॉप्टरने जयपूर विमानतळावर पोहोचतील. येथे भाजपचे काही नेते आणि प्रशासकीय अधिकारी मोदींना निरोप देतील. यानंतर पंतप्रधान मोदी लष्कराच्या विशेष विमानातून बंगळुरूला रवाना होतील.
246 किमी लांबीचा, साडेतीन तासांचा प्रवास : दिल्ली-दौसा-लालसोट रस्ता 246 किमी लांबीचा असून तो 12,150 कोटी रुपये खर्चून विकसित केला आहे. हा मार्ग सुरू झाल्याने दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्याने संपूर्ण प्रदेशात आर्थिक विकासालाही वेग येईल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची एकूण लांबी 1,386 किमी आहे. याच्या बांधकामामुळे, दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे प्रवासाचे अंतर 12 टक्क्यांनी कमी होईल आणि रस्त्याची लांबी 1424 किमी वरून 1242 किमी होईल. तसेच प्रवासाचा वेळही निम्म्यावर येईल. आधी या प्रवासाला 24 तास लागायचे मात्र आता 12 तासच लागतील.
एक्सप्रेसवे सहा राज्यांमधून जाईल : हा एक्सप्रेसवे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाणार असून तो कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडेल. एक्स्प्रेसवे पीएम गति शक्ती आर्थिक क्लस्टर्स, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळ आणि 8 मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कची सुविधा देखील देईल. याशिवाय जेवर विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदर यांसारख्या आगामी ग्रीनफिल्ड स्ट्रक्चर्सचाही फायदा होणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे आजूबाजूच्या सर्व भागांच्या विकासावर सकारात्मक प्रभाव पडेल. या प्रकल्पांमध्ये 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात येणारी बांदीकुई ते जयपूर पर्यंतची 67 किमी लांबीची चार-लाईन शाखा तसेच कोटपुतली ते बारन ओडानियो आणि लालसोट-करौली सेक्शनचा समावेश आहे.
पोलिस अधिकाऱ्यांची बैठक : जयपूर रेंजचे आयजी उमेशचंद्र दत्ता यांनी पायाभरणी समारंभाच्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. उद्घाटन समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मंत्री शांती धारिवाल, भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, दौसा लोकसभा खासदार जसकौर मीणा, राज्यसभा खासदार डॉ. किरोरीलाल मीणा आणि अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
एक्स्प्रेसवेमध्ये काय आहे खास? : मुंबई - दिल्ली एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात लांब हायवे आहे. जर तुम्हाला हा प्रवास ईव्हीने करायचा असेल तर या एक्स्प्रेस वेवर विविध ठिकाणी ईव्ही चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध असेल. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हा एक्स्प्रेस वे इतका प्रगत आहे की, आता दिल्ली ते मुंबई हा प्रवास निम्म्या कालावधीत होणार आहे. याशिवाय कमी अंतरामुळे इंधनाचा वापरही कमी होईल. जनावरे रस्त्यावर येऊ नयेत व संभाव्य अपघात टाळता यावेत यासाठी ठिकठिकाणी प्राण्यांचे पासेस तयार करण्यात आले आहेत.
स्ट्रेचेबल हायवे लेन : हा 8-लेन एक्स्प्रेस वे देशातील पहिला स्ट्रेचेबल हायवे आहे. तो गरज भासल्यास 12 लेनपर्यंत वाढवता येऊ शकतो. यावर प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर ट्रॉमा सेंटरची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिल्लीहून मुंबईला जाताना दर ५० किलोमीटरवर एक थांबा नक्कीच असेल. हा महामार्ग टोलच्या बाबतीत वेगळा आहे, कारण यावर तुम्हाला अनेक ठिकाणी टोलनाक्यावरून जावे लागणार नाही. या महामार्गावरून बाहेर पडल्यावर किलोमीटरनुसार टोल भरावा लागेल.
वन्यजीवांसाठी ओव्हरपास सुविधा : एक्स्प्रेस वेवर 40 पेक्षा जास्त मोठे इंटरचेंज असतील, जे अलवर, दौसा, कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या शहरांशी कनेक्टेड असतील. द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी 12 लाख टन स्टील वापरण्यात येणार आहे, जे 50 मोठ्या पुलांइतके आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाचे प्रारंभिक बजेट 98,000 कोटी रुपये होते. या प्रकल्पातून 10 कोटी रोजगार निर्माण होणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा द्रुतगती मार्ग आहे, जिथे वन्यजीवांसाठी ओव्हरपासची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
हेही वाचा : Haridwar Car Accident : भरधाव स्कॉर्पिओने लग्नाच्या वरातीला चिरडले ; एक ठार, 31 जखमी