नवी दिल्ली : शहराच्या विकासपुरीमध्ये असणाऱ्या यूके नर्सिंग होममध्ये मंगळवारी रात्री अचानक आग लागली. याठिकाणी २६ रुग्णांवर उपचार सुरू होते. सुदैवाने वेळीच ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
अग्निशामक दलाला रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास आगीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने आठ गाड्या याठिकाणी दाखल झाल्या. अग्निशामक दलाचे एक पथक आग शमवण्यासाठी प्रयत्न करत होते, तर दुसरे पथक रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम करत होते. काही वेळातच सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तसेच, आगीवरही नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. अग्निशामक दलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी याबाबत माहिती दिली.
१७ कोविड रुग्णांचा वाचला जीव..
या नर्सिंग होममध्ये दाखल असलेल्या एकूण २६ रुग्णांपैकी १७ रुग्ण कोरोनाचे होते. या सर्वांना वेळीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळाले. या रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्यांदा आरटीपीसीआर करू नये-आयसीएमआर