बंगळुरू Fire in Pub : बुधवारी (१८ ऑक्टोबर) बंगळुरूमधील एका पबला भीषण आग लागली. पबच्या किचनमध्ये लागलेल्या या आगीत संपूर्ण पब जळून खाक झालाय. बेंगळुरू जवळील कोरमंगला येथे ही घटना घडली. या आगीत इमारतीचा वरचा मजलाही पूर्णपणे जळून खाक झाला. आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
गॅस गळतीमुळे आग लागल्याची शक्यता : इमारतीच्या चौथ्या मजल्यावर 'मड पाईप' नावाचा एक पब चालवला जात होता. या पबच्या किचनमध्ये बुधवारी पहाटे आग लागली. आगीच्या ज्वाला किचनच्या फर्निचरमध्ये पसरल्या, त्यामुळे जास्त भडका उडाला. आग लागल्यानंतर पबमधील कर्मचारी तातडीनं बाहेर आले. स्वयंपाक करताना गॅस गळतीमुळे आग लागली असावी, असा संशय आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांद्वारे आग विझवण्यात आली.
कर्मचाऱ्यानं चौथ्या मजल्यावरून उडी मारली : इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मड पाईप पब आणि त्याच मजल्यावर कारचं शोरूम आहे. पब दुपारी १२ नंतर उघडणार असल्यानं तेथे फारसे कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, आग लागल्यानंतर पबमधील एका कर्मचाऱ्यानं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पार्किंगमधील दुचाकी जळून खाक : आगीमुळे पबमधील काही उपकरणांचं आणि वस्तूंचं नुकसान झालं. तर पार्किंगमधील काही दुचाकीही जळून खाक झाल्या आहेत. या आगीत एका कारचंही नुकसान झालं. जळत्या इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला, हे दृश्य एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केलंय. या दृष्याद्वारे स्फोटाची भीषणता दिसून येते. याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा :