लखनऊ : उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमधील सरकारी रुग्णालयात एका रुग्णाने दुसऱ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. कोणत्या बेडवर कोण झोपणार अशा क्षुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली. रविवारी ही घटना घडली.
ढकिया हमेंनगर गावातील हंसाराम (४५) या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना २१ नंबरचा बेड देण्यात आला होता. याच वॉर्डमध्ये २७ नंबर बेडवर अब्दुल रहमान म्हणून दुसरा रुग्ण दाखल होता. रविवारी अब्दुल शौचालयातून परतल्यानंतर जेव्हा वॉर्डमध्ये परतला, तेव्हा तो हंसारामच्या बेडला आपला बेड म्हणू लागला.
यानंतर त्याने वाद घालत हंसारामला बेडवरुन उठण्यास सांगितले. मात्र, हंसाराम तेथून हलले नाहीत. यानंतर रागाच्या भरात अब्दुलने हंसारामला खाली ढकलत मारहाण केली. या मारहाणीतच हंसारामचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यानंतर पोलिसांनी अब्दुलला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! केंद्राकडून रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी