बेळगाव - चार मुलांना विष पाजून वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या हुक्केरी तालुक्यातील बोरगळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गोपाळ हादीमनी (वय 46) असे वडिलांचे नाव आहे. तर सौम्या (वय 19), स्वाती (वय 16), साक्षी (वय 12), श्रीजन (वय 10) अशी चारही मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील बोरगळ येथील गोपाळ हादीमनी यांच्या पत्नीचे गेल्या दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. ब्लॅक फंगसमुळे त्यांची पत्नी जया हादीमनी यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबच नैराश्येत होते. पत्नीच्या मृत्यूनंतर प्रचंड नैराश्यमुळे पतीने आपल्या चारही मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.
गोपाळ हादीमनी होते माजी सैनिक
गोपाळ हादीमनी हे एक माजी सैनिक होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने ते नैराश्येत होते. आपल्या चारही मुलांच्या सोबत ते इथेच राहत होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांनी मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, एकाच घरातली पाच व्यक्तींच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावासह बेळगावमध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी नातेवाईक, गावकऱ्यांसह शेजाऱ्यांनी मृतदेहांना पाहून केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
हेही वाचा- राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. बेळगावमधील संकेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.