इलाहाबाद : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे डिसेंबरपर्यंत चालू राहील, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आज दिली. ते इलाहाबादमध्ये बोलत होते.
बंगालच्या शेतकऱ्यांना एमएसपीसाठी आंदोलनाचे आवाहन..
टिकैत यांनी काही दिवसांपूर्वी बंगालचा दौरा केला होता. "केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रसार करताना प्रत्येक व्यक्तीला धान्याचा एक कण मागत आहेत. मी बंगालच्या शेतकऱ्यांना विनंती केली, की तुम्ही १,८५० रुपये प्रति क्विंटल एमएसपीची मागणी करा" असे टिकैत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आंदोलनासाठी देशभरात फिरणार..
या आंदोलनाबाबत प्रसार करण्यासाठी बंगालनंतर आता देशाच्या इतर भागातही जाण्याचा आपला विचार असल्याचे टिकैत म्हणाले. बिहारमध्ये सध्या भातासाठी ७५० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भातासोबतच इतर धान्यासाठी एमएसपी लागू होईल याची कायदेशीर खात्री आम्ही मागत आहोत, असे टिकैत म्हणाले.
टिकैत म्हणाले, की आपण केवळ दिल्लीमध्ये बसून राहणार नाही, तर १४-१५ मार्चला मध्य प्रदेश, १७ मार्चला राजस्थान, १८ मार्चला गाझीपूर, १९ मार्चला ओडिशा आणि २१-२२ मार्चला कर्नाटकला भेट देणार आहोत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे पुढे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुरू राहू शकते, असेही टिकैत यावेळी म्हणाले.
हेही वाचा : लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा; येदीयुरप्पांचा नागरिकांना इशारा