नवी दिल्ली/गाझियाबाद - केंद्र सकारने पारीत केलेल्या नवीन कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचे सुरू असेलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. गाझीपूर सीमेसह राजधानी दिल्लीच्या विविध सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शेतकरी नेत्यांकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज ( 27 सप्टेंबर) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांकडून सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक मार्गात महत्वाचे बदल केले आहेत.
गाझीयाबादचा मार्ग बंद करणार -
दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे - यूपी गेट (दिल्ली ते गाझियाबाद हा रस्ता) येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी महामार्गावर तंबू लावून रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉली उभ्या केल्या आहेत. तर दिल्लीहून गाझियाबादकडे येणाऱ्या दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर वाहतूक सामान्यपणे सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे गाझियाबाद जिल्हा अध्यक्ष विजेंद्र चौधरी यांच्या मते, भारत बंद दरम्यान दिल्ली ते दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेचा गाझियाबादचा मार्गही बंद केला जाईल. ज्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच मार्ग बदलले आहेत.
सकाळी 6 ते सायंकाळी 4 पर्यंत देशभरात चक्का जाम-
भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय माध्यम प्रवक्ते धर्मेंद्र मलिक यांच्या मते, 27 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ संयुक्त मोर्चाने भारत बंद पुकारला आहे. देशभरातील शेतकरी या बंद मध्ये सहभागी होतील. हा भारत बंद देशातील शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार आहे. भाकियूने हा बंद पूर्ण तयारीसह यशस्वी करण्याचे आवाहनही केले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन रणनीती तयार करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे कामगार सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत चक्का जाम आंदोलन करतील.
धर्मेंद्र मलिक यांच्या मते, भारत सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आणि किमान आधारभूत किमतीच्या हमीवर कायदा करेपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहील.
काय चालू राहणार, काय बंद?
संयुक्त किसान मोर्चाने सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत बंदचे आवाहन केले आहे. या काळात सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील. सर्व आपत्कालीन सेवा, रुग्णालये, औषध दुकाने यांना बंद दरम्यान सूट मिळेल. बंद दरम्यान रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा बंद केल्या जाणार नाहीत.
काँग्रेस आपकडून बंदला समर्थन-
अनेक खाजगी वाहतूक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या बंदला पाठिंबा दिला आहे. याशिवाय काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या भारत बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणीही काँग्रेसने सरकारकडे केली आहे. 17 सप्टेंबर 2020 रोजी शेतीशी संबंधित तीनही कायदे संसदेत मंजूर झाले. हे तेच कायदे आहेत, ज्यांच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन अजूनही चालू आहे.