चंदीगड : शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच एमएसपी आणि इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. यासाठी एकूण पाच शेतकरी संघटना संसदेकडे कूच करणार आहेत. दिल्लीच्या बंगला साहिब येथे शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येत आहेत. संसदेवर मोर्चा नेणाऱ्या या शेतकरी संघटनांमध्ये भारतीय किसान महासंघ, भारतीय किसान युनियन मानसा, भारतीय किसान युनियन राजेवाल, आझाद किसान संघर्ष समिती आणि किसान संघर्ष समिती पंजाब यांचा समावेश आहे.
जंतरमंतरवर शेतकरी आंदोलन करणार : आजपासून संसदेच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यावेळी 2 ते 3 हजार शेतकरी निदर्शने करतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा विरोध रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बंगला साहिब गुरुद्वाराचे पोलीस छावणीत रूपांतर केले आहे. शेतकऱ्यांना जंतरमंतरवर जाण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क आहे. पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत.
बंगला साहिब ते संसदेपर्यंत मोर्चा : शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल म्हणाले की, शेतकऱ्यांनी पंजाबचे पाणी, प्रदूषण आणि एमएसपीसाठी मोर्चा काढला आहे. विविध कारणांमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला होता. आता 13 मार्चला दिल्लीत जाऊन केंद्र सरकारला घेराव घालणार असल्याचा निर्धार संघटनांनी केला आहे. शेतकरी संघटना गुरुद्वारा बंगला साहिब ते संसदेपर्यंत मोर्चा काढणार आहेत. संसदेला घेराव घालण्यासंदर्भात चंदीगड येथे संयुक्त किसान मोर्चाच्या 5 संघटनांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंजाबची सद्यस्थिती, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आणि पंजाब सरकारचा आगामी अर्थसंकल्प यावर चर्चा झाली. याशिवाय पंजाबचे पाणी, प्रदूषण आणि किसान मोर्चाची पुढील रणनीती याबाबत माहिती देण्यात आली.
हेही वाचा : Umesh Pal Murder Case : उमेश पाल खून प्रकरणातील शूटरला अटक, पोलिसांकडून मात्र अद्याप पुष्टी नाही