नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर समाज माध्यम कंपनीने कारवाई केली आहे. नियमभंग केल्याने ट्विटरनंतर फेसबुकनेही राहुल गांधींची पोस्ट काढून टाकली आहे. दिल्लीमधील बलात्कारातील नऊ वर्षाच्या पीडितेच्या पालकांचा फोटो राहुल गांधी यांनी समाज माध्यमात पोस्ट केला होता.
राहुल गांधींनी बलात्कारातील अल्पवयीन पीडितेच्या पालकांचा पोस्ट केलेला फोटो काढून टाकल्याची माहिती फेसबुकने राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला (NCPCR) दिली आहे. हा फोटो राहुल गांधीचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी फेसबुकने इन्स्टाग्रामसह फेसबुकवरील नियमांचे उल्लंघन करणारा फोटो काढून टाकण्याकरिता राहुल गांधी यांना कळविले होते. नियमभंग केल्याने कंटेन्ट काढून टाकण्याची कारवाई केल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले.
पीडितेची ओळख उघड केल्याने ट्विटरने राहुल गांधींच्या ट्विटरवर अकाउंटवर केली होती कारवाई
ट्विटरने राहुल गांधींचे 6 ऑगस्टला ट्विट काढले होते. कारण, त्यांनी दिल्लीमधील बलात्कार पीडितेची ओळख जाहीर केली होती. ही पीडिता अल्पवयीन होती. पोक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
काय घडली होती घटना?
काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील जुना नांगल येथे स्मशान घाटावर 9 वर्षांची मुलगी वॉटर कुलरचे पाणी पिण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो राहुल गांधी यांनी ट्विट केला होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे ट्विट काढण्याचे 4 ऑगस्टला आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट काही काळापुरते स्थगित करण्यात आले होते. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
संंबंधित बातमी वाचा- राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करा, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची मागणी
संंबंधित बातमी वाचा-ट्विटर अकाउंट पुर्ववत होताच राहुल गांधींचे ट्विट, म्हणाले...
संंबंधित बातमी वाचा-Twitter v/s Congress : प्रियांकासह काँग्रेस नेत्यांनी राहुल यांचा ठेवला फोटो प्रोफाईल