पणजी (गोवा) - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होण्याची आहे. त्यामुळे गोवा राज्यातील स्तनदा मातांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची शिफारस राज्यातील तज्ज्ञांची समिती सरकारला करणार आहे. समितीचे अध्यक्ष तथा गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
समिती आपल्या शिफारशी विशेष कृतिदलासमोर ठेवणार -
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या या समितीमध्ये राज्यातील तज्ञ डॉक्तरांचा समावेश आहे. करोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आतापासूनच ही लाट रोखण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्याचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीत सरकारी आणि खासगी रुग्णालयातील कार्यरत असलेल्या दिग्गज बालरोग तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या झालेल्या बैठकीत तज्ज्ञ समितीने केलेल्या तज्ज्ञ शिफारशी सूचना आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील विशेष कृतिदलासमोर ठेवण्यात येतील, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.
गोमेकॉत बालकांसाठी आयसीयू विभागात १०१ खाटा
सध्या गोवा मेडिलक कॉलेजमध्ये नवजात बालकांसाठी आयसीयू विभागात १०१ खाटा आहेत. त्यात आणखी दहा खाटा तसेच मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्नालयातील विभागात तत्काळ पाच खाटा वाढवण्याचा निर्णय तज्ज्ञ समितीने घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा जोर वाढला तर त्यात आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. काकोडकर यांनी दिली. राज्यात सध्या १२ वर्षांखालील ३.२ लाख मुले आहेत. तर १८ वर्षांखालील मुलांची संख्या चार लाखांच्या आसपास असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पालकांनी सतर्क रहावे. आपल्या मुलांना अतिसार, उलट्या सुरू असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ञ समितीचे सदस्य डॉ. सिल्वेरा यांनी केले.
या आहेत तज्ज्ञ समितीच्या शिफारसी
नवजात बालके तसेच लहान मुलांमध्ये मातांद्वारे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे स्तनदा मातांना १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात प्राधान्य द्यावे. स्तनदा मातांसह इतर प्रकारचे आजार असलेल्या मातांनाही तत्काळ कोविड लसी द्याव्या. लहान मुलांवर उपचारांसाठी चाचण्या, खाटा, विलगीकरण, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णालये आदी साधनसुविधांत वाढ करण्यात यावी. गरज पडल्यास उत्तर आणि दक्षिण गोव्यात करोनाग्रस्त बालकांवरील उपचारांसाठी प्रत्येकी एकेक कोविड रुग्णालय स्थापन करण्यात यावे. अशा शिफारशी या तज्ञ डॉक्टरांच्या समितीने केल्या आहेत.