नवी दिल्ली: ईटीव्ही भारतला अभिनेता सोनू सूदने एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू दिला. यामध्ये त्याने कोरोना काळात लोकांना केलेली मदत, देशाची आर्थिक स्थिती, राजकारणातील एंट्री आणि इतर बऱ्याच विषयांवर सोनूने मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या मुलाखतीतील काही भाग तुमच्यासाठी.
ईटीव्ही भारत- कोरोनापूर्वी तुम्ही सोनू सूद होता, आता तुम्हाला मसीहा, सुपरमॅन, देवदूत आणि इतर अनेक नावांनी लोक संबोधित करताहेत, कसं वाटतंय?
सोनू सूद- मी एक सामान्य माणूस आहे आणि मला वाटतं की जेव्हा आपण सामान्य लोकांशी जोडलेले असतो तेव्हाच खरं काय ते पाहतो. त्यामुळे ज्यांना गरज आहे, त्यांच्याशी मी जोडलेलो आहे, यापेक्षा मोठी कोणतीच पदवी असू शकत नाही. जेव्हा लोक आपल्याला जवळचं मानतात, तेव्हा ते काय पदवी देतात, हे महत्वाचं ठरत नाही.
ईटीव्ही भारत- लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही तो विश्वास जपला. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं आणि पुढे काय करणार आहात?
सोनू सूद- मदतीची नेहमीच गरज असते. कोरोना काळात लोकांच्या समस्या समोर आल्या. जेव्हा लॉकडाऊनमध्ये मजूर आपल्या मुलांना घेऊन चालत गावी निघाले, तेव्हा मला वाटले की उद्या या मुलांना असे वाटू नये की कोणीच त्यांच्या पालकांची मदत केली नाही. आणि मग मी विचार केला ही हा मदतीचा हात माझाच का असू शकत नाही. त्यानंतर केव्हा संपूर्ण देशभरात आम्ही मदत पोहोचवली, हेदेखील कळलं नाही. असं एकही राज्य नव्हतं जिथे आम्ही ट्रेन, बस आणि विमान पाठवलं नाही. जवळजवळ १० लाख लोकांना मदत केली. लोकांना नोकऱ्या दिल्या, काहींवर उपचार केले.
ईटीव्ही भारत- लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलीए, मात्र सोनू सूदसाठी फंडिंग सुरूच आहे, हे कुठून येतंय?
सोनू सूद- मी स्वतःच माझे मार्ग शोधले. माझ्यापेक्षा जास्त रिसोर्स असणारेही अनेक लोक आहेत. कोणतंही काम करताना मला वाटतं आपली नियत महत्वाची असते.
ईटीव्ही भारत- तुम्ही लोकांंसाठी एवढं करत आहात, मग निवडणूक लढवून राजकारणी का बनत नाहीत?
सोनू सूद- राजकारण हे एक अद्भुत क्षेत्र आहे. मात्र, लोकांनी त्याला वेगवेगळे रंग दिले याचं वाईट वाटतं. मी राजकारणाच्या विरोधात नाही. पण एक अभिनेता म्हणून मला बरच काम करायचंय. त्यामुळे मी राजकारणात येण्यासाठी सध्या तयार नाही. मला लोकांची मदत करायचीय.
ईटीव्ही भारत- लोकांना सरकारपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे, याची कारणं काय आहेत, असं तुम्हाला वाटतं?
सोनू सूद -असे नाही की सरकारे काम करत नाहीत. जनतेनेही सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. आपला हक्क आहे, पण आपल्यालाही काहीतरी करावे लागेल. आपण असे नेहमीच म्हणू शकत नाही की असे घडले नाही, तसे झाले नाही. त्यामुळे आपल्यालाही काहीतरी करावे लागेल, मदतीसाठी पुढे यावे लागेल.
ईटीव्ही भारत - तुम्ही राजकारणाच्या विरोधात नाही, मग जर निवडणूक लढवायची झाल्यास तुम्ही कोणतं राज्य निवडाल?
सोनू सूद - माझ्यासाठी सगळी राज्ये सारखी आहेत. मी मुळचा पंजाबचा आहे, महाराष्ट्रात राहतो, आंध्र प्रदेश-तेलंगाना साठी सगळ्यात जास्त काम केलं, आता कर्नाटकमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करतोय. मी धर्म, जात किंवा राज्य या बंधनांमध्ये बांधलो गेलेलो नाही.
ईटीव्ही भारत- लोकांची मदत करताना तुम्हाला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे तुम्ही कितीही निरोगी असलात तरी कोरोना होऊ शकतो हे सिद्ध झालं, काय सांगाल?
सोनू सूद- मी केवळ ५ दिवसांत निगेटीव्ह आलो. मला कोरोना होण्यापूर्वी मी लसीचा एक डोस घेतल होता त्यामुळे की मी फीट होतो त्यामुळे, हे सांगणं अशक्य आहे. मात्र लस घेणं खूप गरजेचं आहे. तसेच व्यायाम देखील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असायला पाहिजे.
ईटीव्ही भारत- सोशल मीडिया वर तुमच्यावर अनेक मीम बनवले गेले, तुम्हीही ते एन्जॉय करताना दिसलात.
सोनू सूद- सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही घरोघरी पोहोचता. लोक तुम्हाला ओळखतात.
ईटीव्ही भारत- चित्रपटांपेक्षा समाज कार्य तुमचा फुल टाइम जॉब झालाय, असं वाटतंय?
सोनू सूद- मदतीची मागणी करत बरेच लोक येतात. त्या सर्वांना मी स्वतः उत्तर द्यावं, यासाठी माझा प्रयत्न असतो. कोणाला नोकरी पाहिजे तर कोणाला उपचार. आता मी सगळ्या कामांसाठी टीम बनवल्या आहेत. सर्वजण आपापली कामं बघतात.
ईटीव्ही भारत- तुम्हाला भारतरत्न, पद्म विभूषण देण्यात यावा, अशी मागणी होतीए, तर हुमा कुरेशींनी तुम्हाला पंतप्रधान बनवण्याची मागणी केली होती.
सोनू सूद- कोरोना काळात लोकांना मदत करताना अडचणी येत होत्या. महाराष्ट्रातून बिहारला जाण्यासाठी ट्रेन मिळत नव्हती. मी सिस्टम चालवत असतो, तर काही वेगळे पर्याय नक्कीच शोधले असते. लोक माझं काम पाहून कौतुक करतात. मला माहिती नाही की मी ते डिझर्व करतो की नाही.
ईटीव्ही भारत - मात्र कंगना राणौत तुमच्या विरोधातील गोष्टींना दुजोरा दिसतीए, काय सांगाल?
सोनू सूद - कंगना चांगली आहे, आनंदी आहे. त्यांचं सोशल मीडिया अकाउंट आहे, त्यावर त्यांना ज्याच्याबद्दल जे वाटतं ते ती लिहिते. मला तिच्या म्हणण्याचा काही फरक पडत नाही. मला १३५ कोटी लोकांसोबत चालायचं आहे. त्यापैकी काही हजार किंवा लाख लोकांना माझ्यासोबत यायचं नसेल, तर त्याने विशेष फरक पडणार नाही. तसेच प्रत्येकाच्या टीकेला मी उत्तर देत बसावं, असं मला वाटत नाही.
ईटीव्ही भारत - सध्या तुम्ही UPSCसाठी फ्री कोचिंग देण्यावर काम करत आहात, हे काम कसं होईल?
सोनू सूद - मला अनेक मेसेज यायचे. मी गरीब आहे, मला मदत करा. गेल्यावर्षी आम्ही विद्यार्थांना २४०० रुपयांची स्कॉरलशिप दिली. मात्र, त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. त्यामुळे मी फ्री कोचिंगचा पर्याय निवडला. आमच्याकडे बरेच अर्ज आले आहेत, आम्ही ते शॉर्ट लिस्ट करतोय. आमच्या इथे शिकून जर कोणी कलेक्टर झालं तर त्याला लक्षात राहील की सोनू सूदने माझी मदत केली होती. तो भविष्यात कोणाची मदत करेल. यातच माझं काम सार्थकी लागेल.
ईटीव्ही भारत - तुमच्या या मोहिमेत तुमचा कोणता रोल मुलांना आवडतोय, फिल्मी चेहरा कि सोशल वर्कर?
सोनू सूद - माझी मुलं मला येता-जाता दिसतात. माझं त्यांच्याशी बोलणंच होत नाही. गेले १५ महिने असेल गेले. कुटुंबीय आणि मुलांना वेळ देऊ शकत नाहीए.
ईटीव्ही भारत- तुमचे कोणते प्रॉजेक्ट येत्या काळात येणार आहेत?
सोनू सूद - यशराजची पृथ्वीराज चौहान नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. त्यानंतर चिरंजीवी सोबत आचार्य चित्रपट येणार आहे. माझाच एक चित्रपट ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे.