हैदराबाद - भारतीय निवडणूक आयोग 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा ( Assembly Election 2022 ) आज जाहीर करू शकतो. या घोषणेमुळे या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता तारखा जाहीर करणार आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 ( Uttar Pradesh Assembly Election 2022 )-
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 312 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. तर 2012 मध्ये सरकार स्थापन करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या केवळ 47 जागा मिळाल्या होत्या. तर बसपाला केवळ 19 जागा जिंकता आल्या होत्या.
- पंजाब विधानसभा निवडणूक 2022 ( Punjab Assembly Election 2022 ) -
पंजाबमध्ये 117 विधानसभेच्या जागा आहेत, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 77 जागा जिंकल्या आणि 10 वर्षानंतर सत्तेत परतले. त्याचवेळी आम आदमी पक्ष 20 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला होता आणि 10 वर्षे सत्तेत असलेला शिरोमणी अकाली दलाला केवळ 18 जागांवर मिळाल्या होत्या.
- उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 ( Uttarakhand Assembly Election 2022 ) -
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 57 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. तर काँग्रेसला केवळ 11 जागा जिंकण्यात यश आले.
- गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) -
40 विधानसभा जागा असलेल्या गोव्यात 2017 विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपाचा हात धरल्यामुळे गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले होते. 2017 मध्ये भाजपला केवळ 13 जागा मिळाल्या होत्या.
- मणिपूर विधानसभा निवडणूक 2022 (Manipur Assembly Election 2022) -
मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. 2017 मध्ये काँग्रेसने 28 तर भाजपने 21 जागा जिंकल्या होत्या. स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 31 जागांचा जादुई आकडा कोणताही पक्ष स्पर्श करू शकला नाही. मात्र मणिपूरमध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले.